कणिक… पीठ इ. इ…

511

कोणाच्याही स्वयंपाकघरातील सापडणारी  पिठंएक आम अन्नघटक पोळी, भाकरी याशिवायही याचे अनेक प्रकार होऊ शकतात

हिंदुस्थानात वेगवेगळ्या पिठांचे जेवढे पदार्थ केले जातात तेवढे परदेशात केले जात नाहीत. युरोप आणि अमेरिकेत बरीच पिठं वापरत नाहीत. तिथे गव्हाच्या पिठापासूनच वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. आपल्याकडे गव्हाच्या पिठाची फक्त कणिक बनते किंवा मैदा बनतो, पण तिथे मैदा बनवताना त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करतात. त्याच्यातला प्रोटिन कंटेंट ते कमी करून टाकतात. काही वेळा काही पदार्थांसाठी हा प्रोटिन कंटेंट मुद्दाम वाढवला जातो. असे वेगळे प्रकार तिथे करून पाहिले जातात. त्यांच्याकडे मैदा किंवा आटा हा बेकिंगसाठी वापरला जातो, पण आपला बेकिंग हा मूळ उद्देश नसतो. आपण गव्हाच्या पिठाच्या चपात्या करतो, लाडू करतो, पुऱया करतो, पण तिकडे फक्त बेकिंगसाठीच आटा, कणिक वापरतात. म्हणजे तिथे पिठांपासून बनवलेल्या बहुतांश पदार्थांसाठी गव्हाचे पीठच वेगवेगळ्या प्रकारे मॉडिफाय करून वापरतात, पण वेगवेगळ्या पिठाच्या पदार्थांची जेवढी व्हरायटी आपल्याकडे असते तेवढी परदेशांमध्ये दिसत नाही.

परदेशात मेक्सिकोमध्ये मक्याचे उत्पादन जास्त असल्यामुळे तिथे बहुतांश मक्याच्या पिठाचे पदार्थ केले जातात. आपल्या इथं पहिलं म्हणजे गव्हाचं पीठ. त्यापासून आपण परोठे, पुरी, रोटी वगैरे बनवतो. नंतर आपल्याकडे असतो तो मैदा. या मैद्यापासून भटुरा, नान वगैरे केले जातात. आपण बेसनही वापरतो. आटा-मैद्यानंतर सर्वात जास्त पीठ आपल्याकडे जर कुठलं वापरलं जात असेल तर ते बेसनचं पीठ… या पिठापासून आपण भजी, ढोकळा वगैरे बनवतो, गुजराती लोक मुठिया बनवतात. त्यानंतर आपल्याकडे वापरले जाते ते तांदळाचे पीठ. या पिठापासून आपण भाकरी बनवतो, मोदक वगैरेही बनवतो.

मक्याच्या पिठापासूनही काही पदार्थ केले जातात. ‘मक्याचा आटा’ असं त्याला म्हटलं जातं. दुसऱया प्रकारचं पीठ म्हणजे रवा… हा रवादेखील गव्हापासून तयार केलेलं पीठच आहे. त्यापासूनही शिरा वगैरे पदार्थ बनवले जातात. नंतर नाचणीचं पीठही आरोग्याच्या दृष्टीने चांगलं असतं. कारण त्यात ग्लुटिन नसतं आणि प्रथिनेही त्यात भरपूर असतात. नाचणीचं सत्त्व म्हटलं जातं. आणखी एक पिठाचा प्रकार म्हणजे बाजरीचं पीठ. ज्वारी आणि बाजरीच्या पिठातही ग्लुटिन नसतं. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने ते चांगलं मानलं जातं. बाजरीच्या पिठापासून थालीपीठ, भाकरी, ढेपला वगैरे बनवलं जातं. नंतर बिहारमध्ये सत्तू नावाचा प्रकार वापरला जातो.

शिंगाडय़ाच्या पिठाच्या पुऱया

साहित्य..पाऊण कप शिंगाडय़ाचे पीठ, अर्धा कप उकडलेले बटाटे (सोलून लगदा केलेले), कापलेली थोडी कोथिंबीर, सैंधव मीठ चवीसाठी, पुऱया तळण्यासाठी तेल.

कृती..सर्वप्रथम एका भांडय़ात शिंगाडय़ाचे पीठ, सैंधव मीठ, उकडलेले बटाटे आणि कोथिंबीर घेऊन हाताने हे सर्व मिश्रण एकजीव करायचे. (हाताची बोटे आणि अंगठय़ाचा वापर करा. वाटल्यास उकडलेले बटाटे आणखी घातले तरी चालेल.) त्यात पाणी न घालता कणिक मळून घ्या.

मळून घेतलेल्या कणकेचे दहा एकसमान गोळे करायचे. या पिठामध्ये ग्लुटीन नसते. त्यामुळे पोळपाटाला ते चिकटू शकते. त्यामुळे पोळपाटावर प्लॅस्टीकची पिशवी पसरून त्यावर पुऱया लाटायच्या. एकावेळी एक गोळा घेऊन त्याच्या साधारण 3 इंच व्यासाच्या पुऱया लाटून घ्यायच्या. लाटून त्या बाजूला ठेवायच्या. सगळ्या पुऱया लाटून झाल्या की मग गॅसवर कढईत तेल गरम करून सगळ्या पुऱया गुलाबी होईपर्यंत तळून घ्यायच्या. उपवासाला शिंगाडय़ाच्या या पुऱया छान लागतात.

मक्के दी रोटीसाहित्य ..2 कप मक्याचे पीठ, अर्धा कप पाणी, अर्धा चमचा ओवा, थोडे तूप आणि मीठ चवीपुरते.

कृती …सर्वप्रथम सर्व सुके साहित्य एका भांडय़ात घ्यायचे. थोडे पाणी घालून ते एकजीव करायचे. हवे असल्यास उरलेले पाणीही घालायचे. मिश्रण एकजीव झाले की त्याचे मध्यम आकाराचे गोळे करायचे. या गोळ्यांच्या चपात्या लाटायच्या. चपात्यांसारखी ही मक्याची रोटी तव्यावर भाजून घ्यायची. तव्यावरच त्यावर थोडे तूप लावून परतायचे. या रोटीवर लोणी लावून वाढायचे. ही रोटी सरसो का सागबरोबर अप्रतिम लागते.

आपली प्रतिक्रिया द्या