आपल्या नायकाच्या विजयी निरोपासोठी सहकारी सज्ज; छेत्री आज खेळणार अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना

हिंदुस्थानी फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री गुरुवार, 6 जूनला कारकीर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. कुवैतविरुद्ध होणाऱया फिफा वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेतील या सामन्यात आपल्या संघ नायकाला विजयाने निरोप देण्यासाठी छेत्रीचे सहकारी खेळाडू मैदानावर जिवाचे रान करताना दिसतील.

भावनिकतेची किनार असलेल्या या सामन्यात हिंदुस्थानी संघाने  बाजी मारली तर ते प्रथमच 18 संघांमध्ये होणाऱया पात्रता फेरीच्या अंतिम चरणासाठी पात्र ठरण्यासाठी दमदार पाऊल टाकतील. त्यामुळे एका दृष्टीने उद्याचा कुवैतविरुद्धचा सामना हिंदुस्थानी संघासाठी ‘करा किंवा मरा’ असाच असेल. गेली दोन दशके हिंदुस्थानी फुटबॉलचा कणा असलेला सुनील छेत्री कारकीर्दीच्या अखेरच्या सामन्यात सर्वस्व पणाला लावताना दिसणार आहे. आपल्या या हीरोचा खेळ ‘याचि देही याचि डोळा’ बघण्यासाठी कोलकात्यातील सॉल्ट लेक स्टेडियम तुडुंब भरणार यात शंकाच नाही.

150 सामने, 94 गोल

हिंदुस्थानचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीच्या नावावर 150 आंतरराष्ट्रीय सामने व 94 गोल आहेत. सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये छेत्री हा ख्रिस्तियानो रोनाल्डो व लियोन मेस्सी यांच्यानंतर सर्वाधिक गोल करणारा तिसरा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू होय. कुवैतविरुद्ध 2023 मध्ये सॅफ चॅम्पियनशिप स्पर्धेत सुनील छेत्रीच्या मदतीने सहल अब्दुल समदने हिंदुस्थानसाठी बरोबरीचा गोल केला होता. त्यानंतर शूटआऊटच्या थरारात हिंदुस्थानने 5-4 गोल फरकाने बाजी मारली होती. त्यामुळे उद्याच्या सामन्यात सुनील छेत्रीसाठी हिंदुस्थानी खेळाडू कसा पराक्रम करतात याकडे तमाम फुटबॉल चाहत्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.