हिंदुस्थानच्या लेकीने शोधला कोरोनाशी लढण्याचा उपाय

समस्त दुनिया कोरोनाच्या भयानक महामारीशी झुंजत असताना हिंदुस्थानी नागरिकांना अभिमान वाटावा अशी कामगिरी अमेरिकेत वास्तव्य करणाऱया या 14 वर्षीय हिंदुस्थानच्या लेकीने केली आहे. अनिका चेब्रोलु असे तिचे नाव आहे. विज्ञानात आपली चौकस बुद्धी दाखवत अनिकाने कोरोनाच्या प्रोटीन धाग्यांना जखडून या विषाणूची वाढ थांबवू शकेल असा रासायनिक रेणू (मोलेक्युल) शोधून काढला आहे. तिने आठवीत असताना लिहिलेल्या शोध निबंधात कोरोनाला रोखणाऱया संभाव्य उपचाराची माहिती दिली आहे. तिच्या या निबंधाला 25 हजार डॉलर्सचे (सुमारे 18 लाखांचे) पारितोषिकही अमेरिकेच्या ‘थ्री एम’ या कंपनीने जाहीर केले आहे.

अमेरिकेतील टेक्सासच्या शाळेत शिकणाऱया अनिकाला काही वर्षांपूर्वी इन्फ्लुएंझाने ग्रासले होते. त्यातून बरी झाल्यावर तिने या विषाणूच्या संरचनेचा अभ्यास करीत त्याची वाढ कशी रोखता येईल यावर अभ्यास केला. या अभ्यासातून अनिकाने एक असा रेणू शोधून काढला की, जो विषाणूंच्या प्रोटीन धाग्यांना ब्लॉक करील आणि त्यांची वाढच रोखेल. अनिकाच्या या शोधाचा आता कोरोनाच्या कोविड-19 विषाणूला रोखण्यासाठी उपयोग होईल अशी अशा संशोधकांना वाटत आहे. त्यांनी अनिकाने शोधलेल्या रेणूच्या सहाय्याने कोरोनाच्या प्रोटीनला ब्लॉक करता येईल का याचा अभ्यास सुरू केला आहे.

काय आहे अनिकाचा शोध

14 वर्षीय अनिका चेब्रोलूने इन सिलिका प्रक्रियेने एक असा रेणू शोधला आहे की, जो विषाणूच्या प्रोटीनच्या धाग्यांना ब्लॉक करील. त्यामुळे कोरोनासारख्या विषाणूंची वाढच खुंटेल आणि रुग्ण या आजारापासून पूर्ण मुक्त होऊ शकेल. अनिकाने या संशोधनपर निबंधात रासायनिक प्रक्रियेने विशेष रेणू (मोलेक्युल) विकसित करण्याची प्रक्रिया सांगितली आहे. तिच्या दाव्यानुसार हा रेणू रुग्णाच्या शरीरात सोडल्यास विषाणूच्या स्पाईक प्रोटीन धाग्यांना पूर्ण ब्लॉक करीत कोरोनाला संपवू शकतो. अनिकाचा हा दावा यशस्वी झाल्यास कोरोनावर मात करण्याचा प्रभावी उपाय वैद्यकीय तज्ञांना मिळणार आहे. हिंदुस्थानच्या या पराक्रमी लेकीच्या दाव्याला यश येवो आणि कोरोनाचा जगातून समूळ नायनाट होवो अशी प्रार्थना समस्त हिंदुस्थानी नागरिक करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या