अमेरिकी नवरे नको गं बाई; हिंदुस्थानमधला वाढता ट्रेंड

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्थलांतरित नागरिकांवर आणलेले निर्बंध आणि अमेरिकेत वाढलेले दहशतवादी हल्ले, वंशभेदामुळे होणाऱ्या हत्या यामुळे ‘अमेरिकी नवरा नको गं बाई’ असाच सूर हिंदुस्थानी तरुणींनी आळवला आहे. यामुळे अमेरिकन नवऱ्या मुलांची मागणी ५० टक्कयांनी घटली असून तरुणी हिंदुस्थानातील तरुणांना पसंती देत आहेत.

विवाह संकेतस्थळांच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी अमेरिकन नवऱ्या मुलाला हिंदुस्थानमध्ये प्रचंड मागणी होती. विवाहसंकेतस्थळ, वर्तमानपत्रातील लग्नाच्या जाहिरांतींमध्येही अमेरिकी मुलांनाच सर्वाधिक पसंती मिळत होती. अमेरिकेचे डॉलर्स, तिथलं हायफाय वातावरण, त्यांची संस्कृती याला भुलून तरुणीही अमेरिकेत राहणाऱ्या मुलांना पसंत करत होत्या. अमेरिकेतील मुलासोबत मुलीचे लग्न झाल्यास तिला अमेरिकेचे नागरिकत्व मिळेल म्हणून लग्नात वाटेल तेवढा खर्च करण्यासही नवऱ्यामुलीच्या घरातले मागेपुढे पाहात नव्हते.

पण अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून येताच हे चित्र बदललं आहे. ट्रम्प यांनी दशतवाद रोखण्यासाठी स्थलांतरितांवर काही मर्यादा घातल्या आहेत. यामुळे अमेरिकेतील अनेक हिंदुस्थानींना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागणार अशी शक्यता आहे. तसेच ट्रम्प यांच्या परराष्ट्रीय धोरणांमुळे ‘एच-१-बी-१’ व्हिसा मिळणेही कठीण झाले आहे. यामुळे हिंदुस्थानी तरुणी व त्यांच्या घरातल्यांना अमेरिकन तरुणाशी लग्न म्हणजे डोक्याला ताप असे वाटू लागले आहे. यातूनच मग अनेकांनी अमेरिकेतील मुलांकडे पाठ फिरवली असली तरी कॅनडा, युके, ऑस्ट्रेलियातील नवऱ्या मुलांना मागणी वाढली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या