हिंदुस्थानी मुलींचा सुवर्ण ‘पंच’- आशियाई बॉक्सिंग  स्पर्धेत जिंकली 12 पदके

418

आशियाई युवा बॉक्सिंग स्पर्धेत हिंदुस्थानच्या मुलींनी रविवारी पाच सुवर्णपदकांची कमाई केली. उलानबटोर (मंगोलिया) येथे झालेल्या या स्पर्धेत हिंदुस्थानने 5 सुवर्णांसह 2 रौप्य व 5 कास्य अशी एकूण 12 पदकांची कमाई केली.

रविवारी नाओरेम चानू (51 किलो), विंका (64 किलो), सनामाचा चानू (75 किलो), पूनम (54 किलो), सुषमा (81 किलो) यांनी हिंदुस्थानला पाच सुवर्णपदके जिंकून दिली. पुरुष गटात सेलाय साय (49 किलो) व अंकित नरवाल (60 किलो) यांना अंतिम लढतीत हार पत्करावी लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याआधी अरुंधती चौधरी (69 किलो), कोमलप्रीत कौर (81 किलोहून अधिक), जॅसमीन (57 किलो), सतेंदर सिंह (91 किलो) व अमन (91 किलोहून अधिक) यांनी हिंदुस्थानला कास्यपदके जिंकून दिली.

पुरुषांच्या सुवर्णपदकाच्या लढतीत सेलायला कझाकिस्तानच्या बाजरबे उलू मुखामेदसेफी याच्याकडून हार पत्करावी लागली. त्यानंतर अंकित नरवाललाही अंतिम लढतीत जपानच्या रेइतो सुतसुमेकडून हार पत्करावी लागली. मग मुलींच्या गटात पूनमने चीनच्या वेइकी काइ हिला पराभून करून हिंदुस्थानच्या सुवर्णपदकाचे खाते उघडले. त्यानंतर सुषमाने कझाकिस्तानच्या बाकितझानकिजी हिला हरवून दुसरे सुवर्णपदक जिंकले. नाओरेम चानूने कझाकिस्तानच्या अनेल बर्किया हिच्यावर विजय मिळवत हिंदुस्थानला तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले. विंका हिने चीनच्या हेनी नुआताइली हिला हरवून आणखी एक सुवर्णपदकाची कमाई केली. त्यानंतर समानाचा चानू हिने उजबेकिस्तानच्या नवबखोर खामिदोवा हिचा पाडाव करून हिंदुस्थानचे पाचवे सुवर्णपदक जिंकून दिले.

आपली प्रतिक्रिया द्या