नेताजी सुभाषचंद्र बोस यांची घोषणा होती, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा. तसेच पॅरालिम्पिक पदकविजेत्यांवर केंद्र सरकारने पुरस्कारवृष्टी केलीय. तुम हमें मेडल दो, हम तुम्हें इनाम देंगे, या थाटात सुवर्ण विजेत्यांना पाऊण कोटी, रौप्य विजेत्यांना अर्धकोटी आणि कांस्य विजेत्यांना 30 लाखांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
पॅरिस ऑलिम्पिकपेक्षा अफलातून आणि जबरदस्त कामगिरी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये झाल्यामुळे खेळाडू, चाहते आणि सरकार सारेच आनंदात होते. क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी पॅरालिम्पिक विजेत्यांना त्यांच्या कष्टाचा आणि कामगिरीचा मान सन्मानाने दिला जाणार असल्याचे जाहीर केले. तसेच मिश्र दुहेरीत पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना 22.5 लाखांचे बक्षीस दिले जाणार असल्याचेही त्यांनी घोषीत केले. एवढेच नव्हे तर आगामी पॅरालिम्पिकमध्ये यापेक्षा अधिक जोरदार यशासाठी सर्व खेळाडूंना आर्थिक बळ आणि सर्व सोयीसुविधा देण्याचेही आश्वासन दिले.
2016 च्या पॅरालिम्पिकमध्ये 4 पदकांवर असलेला हिंदुस्थान आता 29 पदकांसह 18 व्या स्थानावर पोहोचलाय. आपला देश पॅरालिम्पिक आणि पॅरा खेळांमध्ये प्रगती करतोय. 2028 च्या लॉस एंजिल्समध्ये आपले खेळाडू मोठ्या संख्येने पदके जिंकावीत म्हणून आम्ही कोणतीही कसर सोडणार नसल्याची ग्वाही क्रीडामंत्र्यांनी दिली.
हिंदुस्थानने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सर्वाधिक 7 सुवर्णांसह सर्वाधिक 19 पदकांचा विक्रम नोंदविला आहे. त्यामुळे सर्व पॅरा खेळाडूंचे हिंदुस्थानात जोरदार स्वागत केले गेले. आता त्याच जोश आणि जल्लोषात त्यांचा गौरवही केला जाणार आहे.