देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना जवानांनी त्यांच्याच भाषेत उत्तर दिले – पंतप्रधान नरेंद्र मोदी

589

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी (Independence Day) केलेल्या भाषणामध्ये हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या शेजारी राष्ट्रांनाही ठणकावले. सीमा रेषा असो अथवा प्रत्यक्ष ताबा रेषा ज्या ठिकाणी देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्यात आले आपल्या वीर जवानांनी त्यांना चोख उत्तर दिले असे पंतप्रधानांनी म्हटले. लडाखमधील गलवान खोऱ्यातील संघर्षाचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की आमचे जवान काय करू शकतात हे संपूर्ण जगाने पाहिले आहे.

चिनी सैनिकांसोबत गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात कर्नल संतोष बाबू यांच्यासह हिंदुस्थानचे 20 जवान शहीद झाले होते. हिंदुस्थान आणि चीनच्या सैनिकांमध्ये 15 जून 2020च्या रात्री गेल्या पाच दशकांतील सर्वात भीषण संघर्ष झाला होता. चीनतर्फे गलवान खोऱ्यातील पेट्रोलिंग पॉइंट 14च्या परिसरात टेहळणी चौकीच्या उभारणीला भारतीय सैनिकांनी विरोध केला होता. या विरोधानंतर चिनी सैनिकांनी खिळे लावलेल्या काठय़ा, लोखंडी कांबी वापरून त्यांच्यावर भीषण हल्ला केले होता. यात 16 बिहार रेजिमेंटच्या कर्नल बी. संतोष बाबू यांच्यासह एकूण 20 जवान शहीद झाले होते. हिंदुस्थानी सैनिकांनी चिन्यांचा कडवट प्रतिकार केला होता. या हल्ल्यात 40-45 चिनी जवान ठार मारल्याचे सांगण्यात येत आहे. चीनने आपले जवान मारले गेल्याचं स्वीकार केलं होतं, मात्र किती जवान मेलेत याबाबत त्यांनी काहीही माहिती दिलेली नाहीये. पंतप्रधानांनी गलवान खोऱ्यात उडालेल्या या चकमकीबाबत बोलताना म्हटले की देशाचे सार्वभौमत्व हे सर्वतोपरी आहे. यासाठीच्या संकल्पासाठी आपले जवान काय करू शकतात हे लडाखमध्ये जगाने पाहिले आहे.

पंतप्रधान त्यांच्या भाषणात म्हणाले की मातृभूमीसाठी आपले प्राण ओवाळून टाकणाऱ्या सगळ्या वीर जवानांनामी आदरपूर्वक नमन करतो. दहशतवाद असो अथवा विस्तारवाद, हिंदुस्थानने प्रत्येक संकटाचा मुकाबला केला असल्याचे ते म्हणाले. हिंदुस्थानने शांतता आणि सौहार्दासाठी जितके प्रयत्न केले आहेत तितकेच प्रयत्न हे देशाच्या सुरक्षेसाठी आणि आपले सैन्यदल मजबूत करण्यासाठी केल्याचेही ते म्हणाले.

हिंदुस्थानने शेजारी राष्ट्रांशी असलेले संबंध सुरक्षितता, विकास आणि विश्वासाच्या पायावर जोडण्याचा सातत्याने प्रयत्न केल्याचे पंतप्रधान म्हणाले. भौगोलिक सीमा ज्यांच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत फक्त तेच देश आमची शेजारी राष्ट्रे आहेत असे नाही, तर ज्या राष्ट्रांशी आम्ही मनाने आणि हृदयाने जोडले गेलेलो आहोत ती देखील आमची शेजारी राष्ट्रे आहेत असे पंतप्रधान म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या