Amritpal Singh अमेरिकेत खलिस्तान्यांचा उत्पात, हिंदुस्थानी पत्रकारावर हल्ला; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ

पंजाबमध्ये अमृतपाल सिंग (Amritpal Singh) याच्याविरोधात कारवाई सुरू होताच जगभरातील खलिस्तान समर्थक बावचळले आहेत. अमेरिका, ब्रिटन, कॅनडासह अन्य काही देशांमध्ये हिंदुस्थानी दूतावासांना टार्गेट करण्यात आले. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील हिंदुस्थानच्या वाणिज्य दूतावासावर आणि ब्रिटनमधील लंडन येथील हिंदुस्थानी दूतावासावर खलिस्तान्यांनी हल्लाही केला. आता खलिस्तान्यांनी थेट हिंदुस्थानी पत्रकाराला निशाणा बनवले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवीगाळ केली आहे. याचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.

अमेरिकेमध्ये खलिस्तान्यांच्या मोर्चादरम्यान हिंदुस्थानी पत्रकार ललित के झा यांच्या बोचऱ्या प्रश्नांमुळे खलिस्तान्यांचा पार चढला आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आगपाखड करत शिवीगाळ केली. तसेच खलिस्तांन्यांची ज्येष्ठ पत्रकार ललित के झा यांच्यासोबत बाचाबाचीही झाली. तसेच त्यांच्यावर हल्लाही केला. याचा व्हिडीओ त्यांनी ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ललित के झा हे अमेरिकेतील हिंदुस्थानी दूतावासासमोर सुरू असलेल्या खलिस्तान्यांचे आंदोलन कव्हर करत होते. याच दरम्यान त्यांनी खलिस्तान्यांना काही टोकदार प्रश्न विचारले. यानंतर उपस्थितांनी त्यांना कॅमेरा बंद करण्यास सांगितले आणि शिवीगाळ करू लागले. पत्रकारासोबत पंतप्रधानांनाही त्यांनी शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या कानावर दोन लाकडी दंडुकेही मारले. यानंतर त्यांनी 911 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधला आणि पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना वाचवले. ही घटना 25 मार्च रोजी दुपारी घडली.

हिंदुस्थानी दूतावासाने व्यक्त केला निषेध

दरम्यान, अमेरिकेत घडलेल्या या घटनेचा हिंदुस्थानी दूतावासाने तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. पत्रकारासोबत झालेल्या गैरवर्तनाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. आधगी पत्रकाराला शिवीगाळ करण्यात आली आणि नंतर हल्ला करण्यात आला. आम्ही तपासयंत्रणांशी संपर्क साधला असून त्यांनी तात्काळ प्रतिसाद दिला. खलिस्तानी समर्थक सतत हिंसक कारवायांमध्ये सहभागी असून यातून त्यांची समाजविघातक वृत्ती समोर येत असल्याचे दूतावासाने आपल्या निवेदनामध्ये म्हटले.

अमृतपाल सिंग अद्यापही फरार

खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग अद्यापही फरार असून त्याला पकडण्यासाठी युद्धपातळीवर शोध मोहीम सुरु असल्याचे पंजाब पोलिसांनी सांगितले. अमृतपाल सिंग सातत्याने वेश बदलत असून त्याचे लाईव्ह लोकेशनही ट्रेस करण्यात आले, परंतु अद्याप त्याला अटक करण्यात यश आलेले नाही.