बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवत १५ वर्षानंतर हिंदुस्थानची अंतिम फेरीत धडक

68

 

लखनौ, (वृत्तसंस्था)

बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ अशा फरकाने हरवत हिंदुस्थानच्या ज्युनियर हॉकी संघाने येथे सुरू असलेल्या ज्युनियर हॉकी वर्ल्ड कपच्या तब्बल १५ वर्षांनंतर अंतिम फेरीत अगदी दिमाखात एण्ट्री मारली. गोलरक्षक विकास दहिया याने पेनल्टी शूटआऊटमध्ये काबिल ए तारीफ कामगिरी केली हे विशेष. आता जेतेपदाच्या लढतीत यजमान हिंदुस्थान संघासमोर बेल्जियमचे आव्हान उभे ठाकले आहे. बेल्जियमने उपांत्य फेरीच्या लढतीत सहा वेळचे चॅम्पियन व गतविजेता जर्मनीवर पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला.

गुरजंत सिंग व मनदीप सिंग यांनी हिंदुस्थानकडून तर टॉम क्रेग व लॅचलन शार्प यांनी ऑस्ट्रेलियाकडून गोल केल्यामुळे उभय देशांमध्ये निर्धारित वेळेत २-२ अशी बरोबरी झाली. ७० मिनिटांच्या खेळामध्ये दोन देशांमध्ये बरोबरी झाल्यामुळे निकालासाठी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. त्यानंतर हिंदुस्थानच्या हॉकीपटूंनी दबावाखाली आपला खेळ उंचावत विजयाला गवसणी घातली.

हरजीत, हरमनप्रीत, सुमीत व मनप्रीत यांनी पेनल्टी शूटआऊटमध्ये गोल करीत हिंदुस्थानचा विजय निश्‍चित केला. ऑस्ट्रेलियाकडून गोवर्स व वेल्च यांनाच गोल करता आले. बर्ड व शार्पला गोल करण्यात अपयशाचा सामना करावा लागला.

आपली प्रतिक्रिया द्या