हिंदुस्थानी खो-खो महासंघाचा प्रताप, चक्क दोन आठवडय़ांत उडवला आशियाई स्पर्धेचा बार

हिंदुस्थानी खो-खो महासंघाने अवघ्या दोन आठवडय़ांत चक्क आशियाई खो-खो स्पर्धा आयोजित करून सर्वांना धक्का दिला आहे. इतक्या कमी कालावधीत आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करून खो-खो संघटनेने हम किसीसे कम नहीं हेसुद्धा दाखवून दिले आहे.

खो-खो महासंघाचे सरचिटणीस महेंद्र सिंग त्यागी यांच्या पुढाकाराने ओडिशातील तामूलपूर क्रीडा संकुलात चौथ्या आशियाई स्पर्धेचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे खो-खो महासंघाने दोन आठवडय़ांच्या कालावधीत खो-खो खेळणाऱ्या आठ देशांची कशी जुळवाजुळव केली, असा प्रश्न खो-खो प्रेमींना पडला आहे. 1 मार्चला खो-खो महासंघाने विशेष सर्वसाधारण सभा बोलावली होती. त्यात वयाची सत्तरी पूर्ण करणाऱया त्यागी यांचा दोन वर्षांचा वाढीव कार्यकाल बैठकीत मंजूर करण्यात आला आणि त्याच सभेत चौथ्या आशियाई स्पर्धेविषयी अंतिम निर्णय घेण्यात आला.

चट मंगनी, पट ब्याह

खो-खोत हिंदुस्थानसमोर सारेच देश लिंबू-टिंबू असल्यामुळे आजच्या घडीला हिंदुस्थानला आव्हान देणारा एकही देश नाही. हिंदुस्थानने आपल्या शाळेतला संघ खेळवला तरी तो संघ आंतरराष्ट्रीय संघाचा फडशा पाडू शकतो, इतकी आंतरराष्ट्रीय खो-खोची प्रगती झाली आहे. त्यामुळेच हिंदुस्थानी संघाला कोणत्याही सरावाची गरज नाही. तरीही औपचारिकता म्हणून हिंदुस्थानी महासंघाने 14 तारखेला सराव शिबिराचे आयोजन केले आणि स्पर्धेच्या पूर्वसंध्येला हिंदुस्थानचे महिला आणि पुरुष हे दोन्ही संघ जाहीर केले. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खो-खो महासंघाने सराव शिबीर आणि संघ निवडीबाबत शेवटपर्यंत गोपनियता पाळली.

हिंदुस्थानी संघाची घोषणा

– पुरुष संघ ः अमित पाटील, अक्षय गणपुले व अरुण गुणकी (सर्व रेल्वे), अक्षय भांगरे, सुयश गरगटे व अनिकेत पोटे (सर्व महाराष्ट्र), अवधूत पाटील (कोल्हापूर), एम. के. गौतम (कर्नाटक), ए. एस. एन. आगिरेड्डी (आंध्र प्रदेश), मदन (दिल्ली), एस. संथरू (तामिळनाडू), व्ही. कबिलन (पुदूचेरी), सचिन भारगो (मध्य भारत), आकाश (उत्तर प्रदेश) व मुकेश (राजस्थान) राखीव ः सुभम काची (मध्य प्रदेश), सीबीन एम. (केरळ) व ध्रुव (हरयाणा).

– महिला संघ ः प्रियंका इंगळे, गौरी शिंदे व अपेक्षा सुतार (सर्व महाराष्ट्र), निकिता पवार (हिंदुस्थानी विमान प्राधिकरण), परविन निशा (दिल्ली), एल. मोनिका (कर्नाटक), बिन्दु (हरयाणा), निर्मला भाटी (राजस्थान), गुरवीर कौर (पंजाब), अर्चना माझी (ओडिशा), दीपिका चौधरी (पी. बंगाल), मीनू (हरयाणा), रंजना (आसाम), नसरीन (हिंदुस्थानी विमान प्राधिकरण) व मधु (दिल्ली) राखीव ः रीहका (मध्य भारत), मोनिका (बिहार) व रेश्मा राठोड (महाराष्ट्र).