येत्या पन्नास वर्षांत मराठीसह ४०० भाषा लुप्त होणार

23

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी संस्कृतीची ओळख असलेल्या ४०० भाषांना धोका निर्माण झाला असून पुढील पन्नास वर्षांत त्या लुप्त होतील, असं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. या ४०० भाषांमध्ये आपल्या मराठी भाषेचाही समावेश असून मराठी भाषेच्या अस्तित्वालाही धोका असल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. पीपल लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया (पीएलएसआय) ने हे सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार एकशे तीस कोटींची लोकसंख्या असलेल्या हिंदुस्थानात सध्या ७८० भाषा बोलल्या जातात. पण, आगामी पाच दशकांच्या काळात यातील ४०० भाषा लुप्त होणार आहेत.

भाषा लुप्त होण्याचं प्रमुख कारणं इतर भाषांचं वापर आणि भाषांची खुंटलेली प्रगती असल्याच हा अहवाल सांगतो. इंग्रजीच्या अतिक्रमणामुळे हिंदुस्थानच्या संस्कृतीच्या द्योतक असलेल्या मराठी, हिंदी, बांग्ला, तेलुगू, मल्याळम, कन्नड, गुजराती आणि पंजाबी या प्रमुख भाषांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. या भाषा हजारो वर्षांपूर्वीच्या असूनही यात कालानुरूप नवीन शब्द समाविष्ट होण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे या भाषांवर इंग्रजीचं अतिक्रमण होत असल्याचं या सर्वेक्षणात म्हटलं आहे. तसंच, प्रामुख्याने आदिवासी समुहांच्या भाषांना नष्ट होण्याचा धोका जास्त प्रमाणात भेडसावत असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

मात्र, काही हिंदुस्थानी भाषा अत्यंत वेगाने प्रगती करत असल्याचंही या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. यात प्रामुख्याने भोजपुरी भाषेचा समावेश आहे. मुंबईसारख्या शहरात तब्बल ३०० भाषा बोलल्या जात असून यात महाराष्ट्रातील ५२, गुजरातमधील ४० आणि कर्नाटकातील १२ भाषांचा समावेश असून भोजपुरी बोलणाऱ्यांची संख्याही मुंबईत वाढत असल्याचंही या अहवालातून समोर आलं आहे.

पीएसएलआयचे अध्यक्ष गणेश एन. डेवी यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली. ते म्हणाले की, जेव्हा कोणतीही भाषा लुप्त होते, तेव्हा त्या भाषेशी संबंधित संस्कृतीही नष्ट होत असते. हिंदुस्थानात गेल्या पन्नास वर्षांमध्ये तब्बल २५० भाषा नष्ट झाल्या आहेत. आगामी काळातही अनेक भाषांना नष्ट होण्याचा धोका आहे. यातल्या मैथिली भाषेसारख्या अनेक भाषांना सुमारे एक हजार वर्षांचा इतिहास आहे. पण, त्यात नवीन शब्द समाविष्ट न झाल्यामुळे भाषेची प्रगती खुंटली आहे, असंही डेवी यांनी स्पष्ट केलं.

आपली प्रतिक्रिया द्या