‘या’ बाबतीत हिंदुस्थान आमच्या खूप पुढे आहे; इमरान खान यांनी मानली हार

जम्मू कश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याच्या मुद्द्यावरून पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा कांगावा केला. तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला पाठिंबा मिळाला नाही. त्यामुळे निराश झालेल्या पाकिस्तानने आप्रत्यक्षपणे आपला पराजय मान्य केला आहे. हिंदुस्थान पाकिस्तानपेक्षा राजनैतिक हालचालींमध्ये खूप पुढे असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी म्हटले आहे. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, रशिया यासारख्या जागतिक महासत्ता असलेल्या देशांसमोर हिंदुस्थान त्यांची बाजू भक्कमपणे मांडत असल्याचे ते म्हणाले. असोशिएशन ऑफ फिजिशियन पाकिस्तानी डिसेंट ऑफ नॉर्थ अमेरिकेच्या (एपीपीएनए) बैठकीत शनिवारी त्यांनी हे मत व्यक्त केले.

अमेरिकेत हिंदुस्थान समर्थकांचा प्रबळ गट आहे. तो हिंदुस्थानची बाजू मजबुतीने आंतरराष्ट्रीय समुदायासमोर मांडत असतो. त्यात आपण मागे पडल्याने अमेरिकेच्या हिंदुस्थान आणि पाकिस्तानकडे बघण्याच्या दृष्टीकोनात महत्त्वाचा बदल झाल्याचेही त्यांनी सांगितले. अमेरिकेने पाकिस्तानबाबत घेतलेल्या अनेक धोरणांमध्ये याचा प्रभाव दिसून येत असल्याचे ते म्हणाले. पाकिस्तान समर्थक गटांपेक्षा हिंदुस्थान समर्थक गटांचा प्रभाव जास्त आहे. त्यामुळे त्याचा आंतरराष्ट्रीय धोरणांवर प्रभाव पडतो, असे ते म्हणाले. पाकिस्तानची बाजू आंतरराष्ट्रीय समुदायासमोर खंबीरपणे मांडण्यासाठी आणि हिंदुस्थानी गटांचा मुकाबला करण्यासाठी आपला गट अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. हिंदुस्थानच्या अंतर्गत कलहावरून आणि जम्मू कश्मीरमध्ये होणाऱ्या मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांवरून जगाचे लक्ष विचलीत करण्यासाठी हिंदुस्थान आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकव्याप्त कश्मीरचा मुद्दा उपस्थित करत असल्याचा कागांवाही इमरान यांनी केला. त्यांनी या बैठकीत केलेल्या वक्तव्यांवरून त्यांची निराशा स्पष्टपणे दिसून आली.

आपली प्रतिक्रिया द्या