कोरोनामुळे हिंदुस्थानींना मृत्यूचा सर्वाधिक धोका; संशोधकांचा इशारा

corona-new

कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असून त्याखालोखाल हिंदुस्थान आणि ब्राझीलला फटका बसला आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या संशोधनामुळे हिंदुस्थानची चिंता वाढली आहे. कोरोनामुळे हिंदुस्थानींना मृ्त्यूचा सर्वाधिक धोका असल्याचे नुकत्याच झालेल्या संशोधनात नमूद करण्यात आले आहे. लंडनमध्ये शुक्रवारी आकडेवारीनुसार करण्यात आलेल्या विश्लेषणात्मक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. ब्रिटन आणि वेल्समध्ये राहणाऱ्या हिंदुस्थानी वशांच्या नागरिकांना कोरोनामुळे मृत्यूचा धोका 50 ते 75 टक्के जास्त असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. हिंदुस्थानी पुरुष आणि महिलांनाही कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा सर्वाधिक धोका असल्याचे अहवालात म्हटले आहे.

‘द ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिक्स’ (ओएनएस) मध्ये कोरोनाचा विविध वर्णावर, जातींवर, समूहावर, समाजावर कसा परिणाम होतो, याचा अभ्यास करून हे निष्कर्ष मांडले आहेत. राहणीमान, जीवनशैली, कामाचे स्वरूप आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती हे महत्त्वाचे घटक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. कृष्णवर्णीय नागरिकांना श्वेतवर्णीयांपेक्षा कोरोनाचा आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचा सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले आहे. दक्षिण आशिया आणि आफ्रिकेतील देशांना याचा सर्वाधिक धोका आहे. या देशातील वातावरण कोरोनाच्या फैलावास पोषण ठरत असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

कोरोनामुळे मृ्त्यूचा धोका महिलांपेक्षा पुरुषांना जास्त असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. श्वेतवर्णियांना संक्रमणाचा जास्त धोका असला तरी मृत्यूचा धोका हिंदुस्थानींना सर्वाधिक आहे. हिंदुस्थानींची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याने त्यांना संक्रमणाची शक्यता कमी असते. मात्र, संक्रमण झाल्यानंतर दुर्लक्ष केल्यास मृत्यूचा सर्वाधिक धोका निर्माण होऊ शकतो, असे संशोधकांनी म्हटले आहे. अल्पसंख्याक समुदाय आणि समाजालाही कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा सर्वाधिक धोका असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

आफ्रिकन, कॅरेबियन, बांग्लादेशी, पाकिस्तानी आणि हिंदुस्थानी नागरिकांना आधीपासून कोणतेही आजार असल्यास अशा व्यक्तींनी सतर्क राहण्याची गरज अहवालात नमूद करण्यात आली आहे. मधूमेह, श्वसनाचे विकार, हृदयरोग,किडनीसंबधित आजार असलेल्या व्यक्तींना कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा सर्वाधिक धोका असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वातावरण,आहार-विहाराच्या पद्धती, जीवनशैली, कामाचे स्वरूप यावर कोरोनाचा प्रभाव अवलंबून असतो. तसेच प्रत्येकाची रोगप्रतिकारक शक्ती महत्त्वाची असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या अहवालामुळे हिंदुस्थानची चिंता वाढली असली तरी हिंदुस्थानींची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या