ऑलिम्पिक चाचणी हॉकी स्पर्धा, हिंदुस्थानचे दोन्ही संघ चाचणी परीक्षेत पास

304

हिंदुस्थानचे दोन्ही (पुरुष आणि महिला) हॉकी संघ ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत पास झाले. बुधवारी हिंदुस्थानच्या पुरूष संघाने न्यूझीलंडचा 5-0 गोलफरकाने धुव्वा उडवीत विजेतेपदावर नाव कोरले, तर महिला संघाने जपानला 2-1 गोलने नमवीत जेतेपदाला गवसणी घातली.

न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी मैदानाच्या मध्यरेषेवर खेळ खेळण्यास अधिक पसंती दिली. सातव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर कर्णधार हरमनप्रीतने गोल करत हिंदुस्थानचे खाते उघडले. लगेचच शमशेर सिंगने 18 व्या मिनिटाला गोल करून आघाडी 2-0ने वाढवली. त्यानंतर पुढच्या 10 मिनिटांत झटपट 3 गोल झाले. निलकांत शर्माने 22 व्या मिनिटाला, गुरसाहबजीत सिंगने 26 व्या मिनिटाला आणि मनदीप सिंगने 27 व्या मिनिटाला गोल करून हिंदुस्थानची आघाडी 5-0 अशी भक्कम केली. ही आघाडी शेवटपर्यंत टिकवत हिंदुस्थानने रुबाबदार विजयासह जेतेपदाला गवसणी घातली.

महिला संघाची जपानवर मात
हिंदुस्थानच्या महिला संघाने ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेच्या अंतिम फेरीत यजमान जपानवर चूरशीच्या लढतीत 2-1 गोलफरकाने मात केली. नवज्योत कौरने 11व्या मिनिटाला गोल करून हिंदुस्थानचे खाते उघडले. मात्र, त्यांचा हा आनंद औटघटकेचा ठरला. कारण पुढच्याच मिनिटाला मिनामी शिमिझु हिने सुरेख मैदानी गोल करून जपानला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. मध्यंतरापर्यंत ही गोलबरोबरी कायम होती. मात्र, दुसऱया हाफमध्ये हिंदुस्थानला 33व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ड्रग फ्लिकर गुरजित कौर हिने या पेनल्टी कॉर्नरवर अचूक गोल करीत हिंदुस्थानला 2-1 असे आघाडीवर नेले.

आपली प्रतिक्रिया द्या