नौदल महिला अधिकाऱ्यांची ‘तारिणी’ नौका जगप्रवासासाठी रवाना

20

सामना वृत्तसेवा । पणजी

‘नाविका सागर परिक्रमा’ या उपक्रमांतर्गत नौदलाच्या महिला अधिकाऱ्यांचे पथक हिंदुस्थानी बनावटीच्या आयएनएसव्ही ‘तारिणी’ या नौकेने जगप्रवासासाठी रवाना झाल्या. केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते तारिणीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. पणजी जवळ असलेल्या आयएनएस मांडवी या नौदलाच्या तळावर हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, नौदल प्रमुख ऍडमिरल सुनील लांबा उपस्थिती होते.

सीतारामन या संरक्षणमंत्री बनल्यानंतर प्रथम गोव्यात आल्या होत्या. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी संरक्षण मंत्री पद सोडल्यानंतर सीतारामन या पूर्णवेळ संरक्षणमंत्री बनल्या असून माजी संरक्षणमंत्र्यांच्या राज्यात नवीन संरक्षण मंत्री येत असल्याने देशाचे लक्ष या दौऱ्याकडे लागून राहिले होते. यावेळी बोलताना, ‘पर्रिकर हे आपले राजकीय गुरु आहेत’, असा उल्लेख सितारामन यांनी केला.

tarini-1

केंद्रीय संरक्षणमंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतर आठवडाभरात अशाप्रकारच्या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होणे, ही आपल्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे, असे निर्मला सीतारमण म्हणाल्या. देशाच्या इतिहासात या ऐतिहासिक क्षणाची नोंद होणार आहे. हिंदुस्थानी नौदलासाठीच नाही तर जगासाठी ही अत्यंत महत्त्वाची मोहीम असल्याचे त्या म्हणाल्या. अतिशय मेहनत, जिद्द आणि चिकाटीने या महिला अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या मोहिमेसाठी त्यांनी आयएनएसव्ही तारिणीच्या चमूला शुभेच्छा दिल्या.

पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांसह सुरू होणारा हा प्रवास पहिल्यांदाच होत आहे. आयएनएसव्ही तारिणी ही आयएनएसव्ही म्हादईची पुढील आवृत्ती आहे. भारत सरकारचा ‘नारी शक्ती’ला असलेला भक्कम पाठींबा लक्षात घेता हा प्रकल्प सागरी नौकानयन उपक्रमांच्या प्रचारासाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

आयएनएसव्ही तारिणीवरील चमूमध्ये लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर स्वाती पी,लेफ्टनंट ऐश्वर्या बोद्दापती, लेफ्टनंट विजया देवी, लेफ्टनंट पायल गुप्ता यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या