खांदेरी पाणबुडीचे १२ जानेवारीला माझगाव गोदीत होणार जलावतरण

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते खांदेरी या अत्याधुनिक पाणबुडीचे १२ जानेवारी रोजी मुंबईतील माझगाव गोदीत जलावतरण होणार आहे. फ्रान्सची मेसर्स डीसीएनएस कंपनी आणि माझगाव गोदी यांनी संयुक्तरित्या या पाणबुडीची बांधणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी १७ व्या शतकात सागरावर आपले प्रभुत्व ठेवण्यासाठी खांदेरी बेटावर केलेल्या लढायांची स्मृती जपण्यासाठी खांदेरी हे नाव पाणबुडीला देण्यात आले आहे. यापूर्वी ६ डिसेंबर १९६८ रोजी खांदेरी या  पहिल्या पाणबुडीचे जलावतरण करण्यात आले होते. ती पाणबुडी २० वर्षे सेवा करून १८ ऑक्टोबर १९८९ रोजी सेवानिवृत्त झाली. आता माझगाव गोदीने या नव्या अत्याधुनिक खांदेरी पाणबुडीची निर्मिती करून परंपरा कायम ठेवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या