हिंदुस्थानी नौदल चीनच्या घरात घुसणार, चार विध्वंसक युद्धनौका दक्षिण चीन समुद्रात करणार शक्तिप्रदर्शन

पूर्व लडाखमध्ये दादागिरी दाखवणाऱ्या चीनला हिंदुस्थानी नौदल त्यांच्याच घरात घुसून तगडे आव्हान देणार आहे. नौदलाच्या चार विध्वंसक युद्धनौका पुढील दोन महिने दक्षिण चीन समुद्रात तैनात राहणार आहेत. या युद्धनौका व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, इंडोनेशिया व फिलीपाईन्स या देशांच्या बरोबरीने युद्धसराव करणार आहेत. या सर्व देशांचा दक्षिण चीन समुद्राच्या हद्दीवरून चीनशी वाद सुरू आहे. ही सर्व शत्रुराष्ट्रे एकसाथ समोर उभी ठाकणार असल्यामुळे चीनच्या पायाखालची वाळू घसरली आहे.

हिंदुस्थानी नौदलामार्फत गाईडेड मिसाईल रणविजय, गाईडेड मिसाईल फ्रीगेट शिवालिक, अॅण्टी सबमरीन कदमत आणि गाईडेड मिसाईल कोरा या युद्धनौका दक्षिण चीन समुद्रासह दक्षिण-पूर्व आशिया आणि वेस्टर्न पॅसिफिकमध्ये युद्धसरावासाठी तैनात केल्या जाणार आहेत. यातील तीन युद्धनौका स्वदेशी बनावटीच्या असून त्या शस्त्रास्त्रे आणि सेन्सर्सनी सज्ज आहेत. संरक्षण मंत्रालयातर्फे मंगळवारी याबाबत घोषणा करण्यात आली. सध्या तैवानवर चीनकडून हल्ला केला जाण्याची दाट शक्यता आहे. चीनच्या अशा अतिरेकी भूमिकेमुळे दक्षिण चीन समुद्रात व्हिएतनाम, इंडोनेशियासह शेजारची बरीच राष्ट्रे त्रस्त आहेत. या देशांनी चीनला धडा शिकवण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. त्याच अनुषंगाने संबंधित देशांच्या युद्धनौका हिंदुस्थानी नौदलाच्या बरोबरीने दक्षिण चीन समुद्रात मुक्काम ठोकून चीनला आपली ताकद दाखवून देणार आहेत.

मित्रराष्ट्रांशी लष्कर संबंध भक्कम करण्यावर भर

– हिंदुस्थान नौदलाच्या युद्धनौका तैनात करण्यामागे मित्रराष्ट्रांसोबत लष्कर सहकार्य वाढवण्याचेही उद्दिष्ट आहे. हिंदुस्थानी युद्धनौका व्हिएतनामी पीपुल्स नेव्ही, रिपब्लिक ऑफ फिलीपाईन्स नेव्ही, रिपब्लिक ऑफ सिंगापूर नेव्ही (सिमबेक्स), इंडोनेशियन नेव्ही (समुद्र शक्ती) आणि रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही (ऑस्ट्रेलिया-इंडेक्स) यांच्यासोबत द्विपक्षीय सरावात भाग घेणार आहेत. तसेच ‘मालाबार-21’ या बहुपक्षीय सरावामध्येही हिंदुस्थानी युद्धनौका सहभागी होणार आहेत.

– हिंदुस्थानी नौदलाच्या युद्धनौका दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त भागापासून साधारण 12 नॉटिकल मैल दूर असतील, त्यामुळे चीनच्या अंगाचा आणखीन तीळपापड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या