अमेरिकेतील व्हर्जिनिया शहरामध्ये पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह गायब केल्याप्रकरणी हिंदुस्थानी वंशाच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. नरेश भट्ट (वय – 37) असे आरोपीचे नाव असून ममता भट्ट (वय – 28) असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून ती बेपत्ता आहे.
ममता भट्ट ही गेल्या तीन आठवड्यांपासून बेपत्ता आहे. मात्र तिचा पती नरेश भट्ट याने याने पोलीस स्थानकात तक्रारही दाखल केली नव्हती. यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी वॉरंट काढत भट्ट दाम्पत्य राहणाऱ्या घरी धडक दिली. घरातील मास्टर बेडरुममध्ये व बाथरूमच्या बाथटबकडे रक्ताचे डाग आढळल्यानतंर नरेश भट्ट याला पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. अर्थात रक्ताची अद्याप डीएनए चाचणी झालेली नाही, मात्र आरोपीने 30 जुलै रोजी वॉलमार्टमधून एक चाकू खरेदी केला होता आणि त्याच चाकूने त्याने पत्नीची हत्या केली, असा आरोप त्याच्यावर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भट्ट दाम्पत्याला 31 जुलै रोजी अखेरचे एकत्र पाहण्यात आले होते. त्यानंतर ती बेपत्ता झाली. मात्र 5 ऑगस्टपर्यंत त्याने ती बेपत्ता असल्याची तक्रारही केली नाही. यादरम्यानच त्याने आपल्या निवासस्थानी पत्नीची हत्या केली. पोलीस तपासात आरोपीने पत्नी न्यूयॉर्क किंवा टेक्सासमधील नातेवाईकांना भेटायला गेली आणि तिथे जाण्यापूर्वी तिने आपला फोनही नष्ट केल्याचे सांगितले. मात्र चौकशीदरम्यान त्या दोन्ही राज्यात तिचा कोणताही नातेवाईक राहत असल्याचा पुरावा मिळाला नाही.
नरेश भट्ट आणि ममता भट्ट यांचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोघांना 1 वर्षाची मुलगीही आहे. नरेश भट्टच्या अटकेनंतर तिला एका सामाजिक संस्थेकडे सोपवण्यात आले आहे. तसेच ममताचे पालक नेपाळमध्ये राहतात. नातवाचा ताबा घेण्यासाठी त्यांना अमेरिकेचा इमर्जन्सी व्हिसाही मंजूर करण्यात आला आहे.
पळून जाण्याची तयारी
दरम्यान, पत्नीच्या हत्येनंतर नरेश भट्ट व्हर्जिनियातून पळ काढण्याच्या तयारीत होता. पोलिसांना त्याच्या राहत्या घरी पॅक केलेली सुटकेस आणि अस्ताव्यस्त पडलेले कपडे सापडले. तसेच नुकतीच त्याने आपली कारही विकली होती आणि घर विकण्याचाही प्रयत्न केला होता, असेही पोलिसांनी सांगितले. ‘इंडिया टूडे’ने याबाबत वृत्त दिले आहे.