हिंदुस्थानी वंशाच्या अनिकाने केलं कोरोनावर संशोधन, अमेरिकेत कौतुकाचा वर्षाव

संपूर्ण जगाला सध्या कोरोनाचा विळखा पडला आहे. कोरोनापासून मुक्तता मिळावी यासाठी लस संशोधन युद्धपातळीवर सुरू आहे. याच दरम्यान अमेरिकेत एका हिंदुस्थानी वंशाच्या मुलीने केलेल्या संशोधनामुळे तिचं कौतुक होत आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, अनिका चेब्रोलू असं या 14 वर्षांच्या मुलीचं नाव आहे. अमेरिकेतील 3एम नावाच्या एका संस्थेने आयोजित केलेल्या युवा वैज्ञानिकांच्या स्पर्धेत कोरोनाशी लढण्याच्या दृष्टीने अनिकाने संशोधन केलं आहे. तिने एक मॉलिक्युल विकसित केला असून तो कोरोना विषाणूविरोधातील लढाईत सहाय्यकारी ठरू शकतो. या मॉलिक्यूलच्या मदतीने शरीरात कोरोना विषाणूला एका प्रथिनांच्या रुपात बंदिस्त करता येऊ शकतं जेणेकरून त्याचा फैलाव रोखता येऊ शकेल.

अनिकाने व्हर्च्युअल माध्यमातून तिच्या संशोधनाविषयी माहिती दिली आहे. ती यापूर्वी फ्लू सारख्या आजारांवर उपयुक्त ठरणाऱ्या औषधांविषयी संशोधन करत होती. याच दरम्यान कोरोना महामारी सुरू झाली आणि तिने त्यावर संशोधन सुरू केलं. युवा वैज्ञानिकांच्या या स्पर्धेत अनिका विजेती ठरली असून तिला 18 लाखांहून अधिक रकमेचं बक्षीस मिळालं आहे.

अमेरिकेत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सगळं जग लस शोधण्यासाठी जुंपलेलं असताना तिचा शोध महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या