हिंदुस्थानची बॅडमिंटनमध्ये ‘सुवर्ण’ क्रांती; सिंधू, सेन यांनी घडविला इतिहास 

इंग्लंडमधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानी बॅडमिंटनपटूंनी सुवर्णक्रांती घडविली. स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने दुखापत विसरून सुवर्ण पदकाला गवसणी घातली, तर त्यापाठोपाठ लक्ष्य सेनने पुरुष एकेरीत सुवर्ण पदकावर नाव कोरत इतिहास घडविला. त्यानंतर सात्त्विक साईराज रेंकीरेड्डी व चिराग शेट्टी या हिंदुस्थानी जोडीने अंतिम लढतीत बाजी मारल्याने हिंदुस्थानने बॅडमिंटनमध्ये सुवर्ण हॅट्ट्रिक साजरी केली. एकाच राष्ट्रकुल स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये तीन सुवर्ण पदके जिंकण्याची हिंदुस्थानची ही पहिलीच वेळ ठरली, हे विशेष. त्याआधी, रविवारी रात्री उशिरा किदाम्बी श्रीकांतनेही कास्य पदक जिंकून या खेळातील पहिले पदक हिंदुस्थानच्या झोळीत टाकले होते.

 सिंधू-मिचेल यांच्यात रंगल्या रॅली 

पी. व्ही. सिंधूने पहिल्या झटक्यात 3-1 अशी मुसंडी मारली होती. मात्र, मिचेल ली हिनेही सिंधूला 4-4 असे गाठून लढतीत रंगत निर्माण केली. एक-एक गुणासाठी उभय खेळाडूंमध्ये रॅली रंगत होती. सिंधूच्या पायाला पट्टी बांधलेली असल्याने पदलालित्यात तिला अडथळा होत होता. याचा फायदा घेत मिचेलने जाळीजवळ देखणा खेळ करत गुणांची कमाई केली. मात्र, सिंधूने नेटमधील अंतर भरून काढत पॅनेडियन खेळाडूवर पलटवार केला. दुखापत विसरून सिंधू मिचेल लीवर तुटून पडली अन् तिने सुवर्ण पदकाचे स्वप्न अखेर सत्यात उतरवले. सायना नेहवाल हिच्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी सिंधू दुसरी खेळाडू ठरली.

सेनने साधले अचूक ‘लक्ष्य’

कारकीर्दीत प्रथमच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या 21 वर्षीय लक्ष्य सेनने पुरुष एकेरीत अचूक लक्ष्य साधत हिंदुस्थानला बॅडमिंटनमधील दुसरे सुवर्ण पदक जिंकून दिले.  सुवर्ण पदकाच्या लढतीत त्याने मलेशियाच्या त्जे योंगचा 19-21, 21-9, 21-16 असा पराभव करीत ऐतिहासिक कामगिरी केली. पहिल्या गेममध्ये एक-एक गुणासाठी पाठशिवणीचा खेळ रंगला होता. 6-6 अशा बरोबरीनंतर योंगने 14-11 अशी आघाडी घेतली. लक्ष्य सेनने जबरदस्त पलटवार करीत 19-18 अशी आघाडी मिळविली. मात्र, त्यानंतर दोन प्रदीर्घ रॅलीनंतर योंगने पहिला गेम जिंकला. दुसऱया गेममध्ये 6-8 अशा पिछाडीवरून लक्ष्य सेनने दमदार खेळ करीत 15 गुण मिळविले, तर योंगला केवळ एकच गुण मिळविता आला.

श्रीकांतने दिले पहिले पदक 

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत किदाम्बी श्रीकांतने रविवारी रात्री उशिरा कास्य पदक जिंकून हिंदुस्थानला बॅडमिंटनमधील पहिले पदक मिळवून दिले. कास्य पदकाच्या लढतीत त्याने सिंगापूरच्या जिए हेंग तेह याचा 21-15, 21-18 असा पाडाव केला.

सात्त्विक-चिराग जोडीची कमाल

बॅडमिंटनमध्ये सात्त्विक साईराज रेंकीरेड्डी व चिरा शेट्टी या हिंदुस्थानी जोडीने अंतिम लढतीत विजय मिळवत हिंदुस्थानच्या झोळीत तिसरे सुवर्ण पदक टाकले. हिंदुस्थानी जोडीने सुवर्ण पदकाच्या लढतीत यजमान इंग्लंडच्या सीन वेंडी व वेन लेन या जोडीचा 21-15, 21-13 असा पराभव करीत इतिहास घडविला.

सोळा वर्षांनंतर सुवर्णयशाची पुनरावृत्ती, शरत कमलला एकेरीत अखेर सुवर्णपदक

 हिंदुस्थानचा टेबल टेनिसपटू अचंता शरत कमलने राष्टकुल क्रीडा स्पर्धेत तब्बल 16 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. याआधी, 2006च्या राष्ट्रकुल स्पर्धेत शरत कमलने सुवर्णपदक जिंकले होते.  40 वर्षीय शरत कमलने सुवर्णपदकाच्या लढतीत यजमान इंग्लंडच्या लियाम पिचपर्ह्डचा 4-1 फरकाने धुव्वा उडविला. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत या हिंदुस्थानी खेळाडूला तीन सुवर्णपदके मिळाली. एकेरीतील सोनेरी यशापूर्वी शरत कमलने मिश्र दुहेरीत आणि पुरूष सांघिकमध्ये हिंदुस्थानला सुवर्णपदक जिंकून दिले होते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या कारकिर्दीत शरत कमलच्या नावावर एकूण सात पदके जमा झाली आहेत.   हिंदुस्थानच्या साथियान गणानाशेखरन याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील टेबल टेनिसमध्ये पुरुष एकेरीत कांस्यपदकाची कमाई केली. त्याने सात गेमपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत यजमान इंग्लंडच्या ड्रॉन्कहेलचा 11-9, 11-3, 11-5, 8-11, 9-11, 10-12, 11-9 असा पराभव करुन हे यश मिळविले.