मुंबई इंडियन्स प्रिव्ह्यू – ‘रोहित सेना’ विजेतेपदाचा चौकार लगावण्यास सज्ज

ganesh-puranik>> गणेश पुराणिक | मुंबई

आयपीएलचा ताज तीन वेळा आपल्या डोक्यावर घेतलेला मुंबईचा संघ यंदाही फेव्हरेट असणार आहे. गेल्या काही वर्षात मुंबईच्या संघाने आपल्या खेळामध्ये कमालीची सुधारणा केली आहे. २०१३ ते २०१७ या पाच वर्षाच्या काळात मुंबईने तिनदा विजेतेपद पटकावले आहे, तर २०१० मध्ये हा संघ उपविजेता राहिला आहे. २०१७ मध्ये आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबईने पुण्याचा अवघा एका धावेने थरारक पराभव करत आपल्या झुंझार खेळाचे दर्शन घडवले होते. मुंबईकर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघ यंदा आयपीएल विजेतेपदाचा चौकार लगावण्यासाठी सज्ज झाला आहे. आयपीएलचा उद्घाटन सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगणार आहे.

रॉयल चॅलेजर्स बेंगलोर प्रिव्ह्यू – ‘चोकर्स’चा शिक्का पुसण्यासाठी कोहली लावणार जोर

जमेची बाजू

मुंबईच्या संघाने आतापर्यंत आयपीएलच्या प्रत्येक सत्रामध्ये एक समतोल संघ मैदानावर उतरवला आहे. फलंदाज आणि गोलंदाजांचा चांगला समतोत यंदाही या संघामध्ये दिसून येत आहे. हिटमॅन रोहित शर्मा, जे. पी. ड्यूमिनी, इविन लूईस यासारखा देशी आणि विदेशी फलंदाजांचा ताफा मुंबईकडे आहे. गोलंदाजीमध्ये मिचेल मॅक्लेघान, पॅट कमिन्स, जसप्रित बुमराह, मुस्तफिजूर रहमानसारखे जगविख्यात गोलंदाज आणि हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, अकिला धनंजया आणि केरॉन पोलार्डसारखे अष्टपैलू खेळाडू आहेत. यापैकी अनेक खेळाडू आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एकमेकांसोबत खेळलेले असल्याने त्यांच्यातील समन्वय मैदानावरही दिसून येईल.

राजस्थान रॉयल्स रिव्ह्यू – रहाणेचे नेतृत्व राजस्थानला ‘रॉयल्स’ बनवणार?

मुंबईच्या संघातील हार्दिक पांड्या हा हुकमाचा एक्का आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आयपीएल २०१७मध्ये मुंबईच्या विजयामध्ये हार्दिकचे योगदान वाखण्याजोगे होते. त्याने मुंबईकडून सर्व सामन्यात खेळताना गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. गेल्या वर्षी हार्दिकने २५० धावा आणि १० बळी अशी अष्टपैलू कामगिरी करत संघाला तिसरे विजेतेपद मिळवून देण्यास महत्त्वाची भूमिका निभावली होती. आता हार्दिकच्या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याच्या अनुभवाचीही जोड मिळाली आहे. त्यामुळे यंदाही तो अशीच धमाकेदार कामगिरी करेल याच शंकाच नाही.

किंग्ज इलेव्हन पंजाब प्रिव्ह्यू : पंजाब आयपीएलचा ‘किंग’ होणार का?

अडचणीच्या बाजू

मुंबईच्या संघामध्ये स्फोटक फलंदाज, धारधार गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंचा चांगला ताफा आहे. परंतु मुंबईला एका उत्कृष्ट फिरकीपटूची कमतरता नक्की जाणवेल. कृणाल पांड्या हा डावखुरा फिरकीपटू वगळता मुंबईकडे कोणताही वेगळा पर्याय नाही. प्रसंगी अनुपकुमर रॉय, अकिला धनंजया, राहुल चहर यांपैकी एकाची निवड करावी लागेल. परंतु यांच्याकडे विशेष अनुभव नसल्याने विरोधी संघ याचा फायदा उठवू शकतो. तसेच एक चांगला यष्टीरक्षक फलंदाज ही देखिल मुंबईची कमजोर बाजू आहे. इशान किशन आणि आदित्य तारे यांच्यामध्ये या जागेसाठी रस्सीखेच असणार आहे. तारे आणि किशनची आयपीएलमध्ये कामगिरी विशेष राहिलेली नाही. दोघांनी एकत्र मिळून ५१ सामने खेळले आहेत. यापैकी ३५ सामन्यात तारेने फक्त ३३९ धावा केल्या आहेत, तर किशनने १६ सामन्यात ३१९ धावा केल्या आहेत.

दिल्ली डेअरडेव्हिल्स प्रिव्ह्यू : गंभीर- पॉन्टिंगची जोडी कमाल करेल?

परदेशी खेळाडूंचे समिकरण

मुंबईच्या संघामध्ये केरॉन पोलार्ड आणि इविन लूईस यांचे स्थान पक्के मानले जात आहे. त्यामुळे उर्वरित दोन जागांसाठी जे. पी. ड्यूमिनी, मुस्तफिजूर रहमान, पॅट कमिन्स, अकिला धनंजया, मिशेल मॅक्लेघान, यांच्यामध्ये चढाओढ असणार आहे. फिरकीपटूची वानवा पाहता ड्यूमिनी आणि अकिला धनंजया या फलंदाज आणि कामचलावू फिरकीपटूंपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.

सनरायझर्स हैदराबाद प्रिव्ह्यू : वॉर्नरविना सूर्य उगवणार?

संभाव्या ११ खेळाडू

१)इविन ल्यूईस २)इशान किशन ३)रोहित शर्मा ४)सूर्यकुमार यादव ५)हार्दिक पांड्या ६)कृणाल पांड्या ७)केरॉन पोलार्ड ८)पॅट कमिन्स / मुस्तफिजूर रहेमान ९) मिचेल मॅकलेघान / बेन कटींग/ अकिला धनंजया १०)जसप्रित बुमराह ११)प्रदिप सांगवान

आमचा अंदाज

आयपीएलमधील आतापर्यंतची कामगिरी आणि आपल्या झुंझार खेळासाठी प्रसिद्ध असलेला मुंबईचा संघ संदाही प्ले ऑफ मध्ये दाखल होण्याची शक्यता असून रोहित सेना चौथ्या विजेतेपदासाठी प्रयत्न करताना दिसेल.