हिंदुस्थानी रेल्वेने वाराणसीच्या नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. वाराणसीतील गंगा नदीवर एक महाकाय पूल बांधण्याची घोषणा केली आहे. या प्रस्तावाला मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे वाराणसीतील हा रेल्वेचा सगळ्यात मोठा पूल असणार आहे. या पुलावर चार रेल्वे मार्ग आणि सहा पदरी महामार्गही बांधण्यात येणार आहेत. हा पूल 137 वर्षे जुन्या मालवीय पुलाच्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. या नवीन पुलासाठी सरकार 2642 कोटी रुपये खर्च करणार आहे. या पुलामुळे वार्षिक 638 कोटी रुपयांची बचतही होणार असल्याचा सरकारचा दावा आहे.
वाराणसीतील पूलावर बांधण्यात येणाऱ्या चार रेल्वे लाईन आणि सहा हायवे लेन हे सुमारे 150 वर्षे टिकतील अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या पुलाचा पाया 120 फूट खोल असणार आहे. त्यावर खांब उभारून त्यावर पूल बांधण्यात येणार आहे. वाहतुकीच्या दृष्टीने हा सर्वात मोठा पूल असेल. त्यावर चार रेल्वे मार्ग आणि सहा महामार्ग मार्ग असतील. रेल्वे लाईन खाली असेल आणि वर 6 लेन हायवे बांधला जाईल. येत्या चार वर्षांत हा पूल पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
वाराणसीतील या भव्य पुलामुळे वाराणसी आणि चंदौली जिल्ह्यांमधील कनेक्टिव्हिटी चांगली होईल. वाराणसी हे हिंदुस्थानी रेल्वेसाठी महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. येथे प्रवाशी आणि कामगारांची रेलचेल सुरूच असते. कोळसा, सिमेंट आणि धान्याच्या वाहतुकीमुळे हा मार्ग नेहमी वर्दळीचा असतो. त्यामुळेच पुलावर 4 रेल्वे लाईन टाकण्यात येत आहेत. या प्रकल्पामुळे रेल्वेचे जाळे सुमारे 30 किमीने वाढणार आहे.