बर्फवृष्टीत अडलेल्या गरोदर महिलेला जवानांनी स्ट्रेचरवरून सुखरूप रुग्णालयात नेले

379

कश्मीर खोर्‍यात सध्या जोरदार हिमवृष्टीने जनजीवन पार विस्कळित झाले आहे. त्यातच सोमवारी श्रीनगरातील शमिमा ही गरोदर महिला प्रसूती वेदनांनी प्रचंड तळमळत होती. ही माहिती मिळताच तेथे तैनात चिनार कॉर्पस्च्या लष्करी जवानांनी त्या अडलेल्या गर्भवतीच्या मदतीसाठी धाव घेतली. शमिमाला तत्काळ रुग्णालयात दाखल करणे अतिशय आवश्यक होते. अखेर त्या महिलेला स्ट्रेचरवर ठेवून 100 जवान आणि 30 स्थानिक नागरिकांनी प्रचंड बर्फाचे थर पार करीत चार तास चालत शहरातील रुग्णालयात सुखरूप आणले. आता बाळ-बाळंतीण दोघेही खुशाल आहेत.

कश्मीर खोर्‍यात हिमस्खलनात आतापर्यंत 76 हिंदुस्थानी जवान शहीद झाले आहेत. असे असतानाही जिवाची बाजी लावून गर्भवती महिलेला सुखरूप रुग्णालयात नेणार्‍या हिंदुस्थानी जवानांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जवानांच्या धैर्याला सॅल्यूट ठोकणारे ट्विट केले.

हिंदुस्थानी लष्कराच्या चिनार कॉर्पस्ची तुकडी श्रीनगरमध्ये तैनात करण्यात आली आहे. शहराच्या सुरक्षेसह अडल्यानडल्या नागरिकांच्या मदतीलाही धावून जाण्यास या तुकडीचे जवान सज्ज असतात. सोमवारी शहरातील दुर्गम भागात एक गर्भवती महिला संकटात असल्याचे कळताच चिनार कॉर्पस्च्या 100 जवानांनी घटनास्थळी धाव घेत बर्फातून चार तास चालत वाट काढत त्या महिलेला स्ट्रेचरवरून सुखरूप रुग्णालयात नेले.  हिंदुस्थानी जवान चक्क देवदूतच बनून आमच्या मदतीला धावले अशा शब्दांत शमिमाच्या कुटुंबीयांनी हिंदुस्थानी लष्कराचे आभार मानले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या