एटीके मोहन बागानची बाजी, इंडियन सुपर लीग फुटबॉल

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) शुक्रवारी एटीके मोहन बागानने (एटीकेएमबी) कट्टर प्रतिस्पर्धी ईस्ट बंगालचा 2-0 असा पराभव केला. याबरोबरच एटीकेएमबीने हिंदुस्थानी फुटबॉलमधील सर्वोच्च प्रतिष्ठsच्या कोलकाता डर्बीत निर्विवाद वर्चस्व राखले. फिजीचा 33 वर्षीय स्ट्रायकर रॉय पृष्णा याने दुसऱया सत्राच्या प्रारंभी गोल केला. त्यानंतर पाच मिनिटे बाकी असताना मानवीर सिंग याने बदली खेळाडू म्हणून लक्ष्य साधले. एटीकेएमबीने याबरोबरच गुणतक्त्यात आघाडी घेतली. त्याचा हा सलग दुसरा विजय असून त्यांचे सहा गुण झाले. नॉर्थईस्ट युनायटेड एफसी (2 सामन्यांतून 4) दुसऱया क्रमांकावर आहे. ही आकडेवारी शुक्रवार रात्रीपर्यंतची आहे.

बहुचर्चित लढतीत स्पेनच्या अँटोनिओ लोपेझ हबास यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱया एटीकेएमबीने लिव्हरपूलचे दिग्गज रॉबी फाऊलर यांच्या एससी ईस्ट बंगालला सहज शह दिला. वास्को येथील टिळक मैदानावर ही लढत झाली. मध्यंतराच्या गोलशून्य बरोबरीनंतर उत्तरार्धाच्या प्रारंभी खाते उघडण्याची शर्यत एटीकेएमबीने जिंकली. मध्य फळीतील जयेश राणे याने डावीकडून मुसंडी मारत ही चाल रचली. त्याने मध्य फळीतील सहकारी जेव्हीयर हर्नांडेझ याला पास दिला. त्यातून पृष्णाला उजवीकडे गोलक्षेत्रालगत चेंडू मिळाला. व्यवस्थित नियंत्रण मिळवत त्याने डाव्या पायाने ताकदवान फटका मारला. ईस्ट बंगालचा गोलरक्षक देबजीत मुजुमदार डावीकडेच झेप टापूनही गोल अडवू शकला नाही. पृष्णाने गेल्या मोसमात 21 सामन्यांत 15 गोल केले होते. सर्वाधिक गोल करणाऱया खेळाडूंच्या क्रमवारीत त्याने संयुक्त अव्वल स्थान मिळविले होते. हबास यांनी 63व्या मिनिटाला आघाडी फळीतील डेव्हिड विल्यम्स याच्याऐवजी मानवीरला बदली खेळाडू म्हणून मैदानावर उतरविले होते. केरळा ब्लास्टर्सविरुद्ध सलामीच्या सामन्यात मानवीरने बदली खेळाडू म्हणूनच प्रभाव पाडला होता. त्याच्या चालीवर कृष्णाने गोल केला होता. यावेळी मानवीरने गोलचा पराक्रम नोंदवीत आपली उपयुक्तता सिद्ध केली.

आपली प्रतिक्रिया द्या