जलतरणाचा खर्च परवडेना! हिंदुस्थानचा अनुभवी जलतरणपटू वीरधवल खाडेची नाराजी

460

आशियाई व दक्षिण आशियाई गेम्समध्ये पदकांची कमाई आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा मराठमोळा जलतरणपटू वीरधवल खाडे याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करण्याची आस बाळगली होती, पण कोरोना व लॉकडाऊनमध्ये ऑलिम्पिक पुढे ढकलण्यात आले आणि वीरधवल खाडेच्या स्वप्नांना सुरुंग लागला. आता पुढच्या वर्षी होणाऱया ऑलिम्पिकसाठी तयारी करायची की नाही याबाबत त्याने आता तरी विचार केलेला नाही. दैनिक ‘सामना’ने त्याच्याशी संवाद साधला असता तो म्हणाला, जलतरणासाठी मला महिन्याला एक लाख रुपयांचा खर्च करावा लागतो. यामध्ये प्रशिक्षक, ट्रेनर, डाएट या सर्व खर्चांचा समावेश आहे. मला इतर कोणाकडूनही स्पॉन्सर्सशिप मिळत नाही. त्यामुळे हा खर्च परवडेनासा झालाय.

ऑलिम्पिकसाठी सज्ज होत होतो अन्…

– या वर्षी टोकियो ऑलिम्पिक होणार होते. त्यामुळे जगातील या अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धेसाठी सज्ज होत होतो. ऑलिम्पिकसाठी ‘ए’ व ‘बी’ या दोन पात्रता फेरी असतात. मी 50 मीटर फ्रीrस्टाईल या प्रकारात खेळतो. या प्रकारात माझ्यासह सहा खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पात्र होण्याच्या शर्यतीत होते. आम्ही सहा खेळाडू ‘बी’ प्रकारात मोडत होतो. ‘ए’ प्रकारातील खेळाडूंचा ऑलिम्पिक प्रवेश पक्का असतो, पण ‘बी’ प्रकारातील एका खेळाडूलाच आगेकूच करता येते. मार्च महिन्यात कोरोनामुळे हिंदुस्थानात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सर्व काही तिथेच थांबले.

ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत वाट बघेन

– युरोप व अमेरिकेत काही खेळांच्या स्पर्धांना सुरुवात झालीय. हिंदुस्थानात कोरोना जास्त प्रमाणात असल्यामुळे अद्याप मोठय़ा प्रमाणात सरावाला सुरुवात झालेली नाही. मला या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करायचे होते, पण कोरोनामुळे टोकियो ऑलिम्पिकही पुढल्या वर्षी ढकलण्यात आले आहे. आता ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापर्यंत स्थितीवर लक्ष ठेवीन. सर्व काही सुरळीत झाल्यास टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळण्याबाबत विचार करीन अन्यथा निवृत्ती स्वीकारीन असे वीरधवल खाडे यावेळी म्हणाला.

लॉकडाऊनमध्येही जॉब सुरू

– जलतरणातील कामगिरीच्या आधारावर तहसीलदार म्हणून मुंबईत नोकरीला लागलो. लॉकडाऊनमध्येही माझी नोकरी सुरू होती. आणखी काही व्यक्ती नोकरीला येत होत्या. काहींना एअरपोर्ट येथे डय़ुटीसाठी जावे लागत होते, असे वीरधवल खाडे पुढे सांगतो.

फिटनेस व डाएटवर मेहनत

– खार जिमखान्यात मी जलतरणाचा सराव करतो, पण कोरोना व लॉकडाऊनमुळे जलतरणाचा सराव करायला मिळत नव्हता, पण घरी योगा व फिटनेसकडे गांभीर्याने लक्ष देत होतो. डाएटवरही कंट्रोल होता. जलतरणाचा सराव लवकरात लवकर सुरू व्हावा असे वाटते, असे वीरधवल खाडे आवर्जून सांगतो.

आपली प्रतिक्रिया द्या