शास्त्री यांचा फोकस चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजावर

265

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी पुन्हा नियुक्ती झालेले रवी शास्त्री यांचे लक्ष आता वन-डे संघात संघासाठी चौथ्या क्रमांकावर प्रभावी कामगिरी करणारा फलंदाज तयार करण्यावर आहे. संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये या विषयावर जोरदार विचारमंथन झाले, पण चौथ्या क्रमांकावरील योग्य फलंदाज मात्र हिंदुस्थानी संघाला अद्याप मिळालेला नाही. त्यामुळेच पुन्हा महागुरुपदाची जबाबदारी खांद्यावर घेतल्यावर शास्त्री यांनी या विषयाला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. शास्त्रीच्या दृष्टीने या क्रमांकावर फलंदाजीसाठी पहिली पसंती मुंबईकर श्रेयस अय्यरला तर दुसरी पसंती यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतला आहे. मात्र कर्णधार विराट कोहलीने श्रेयसचे कौतुक केल्याने अय्यरची या जागेवरील नियुक्ती निश्चित मानली जात आहे.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपले पहिले लक्ष्य टीम इंडियासाठी चौथ्या क्रमांकावर प्रभावी कामगिरी करून संघाला सावरणारा फलंदाज तयार करण्याचे ठेवले आहे. त्यांच्यापुढे आता दोन युवा फलंदाज त्या जागेसाठी आहेत. विंडीजमध्ये वन-डे मालिकेत पाचव्या स्थानी फलंदाजीला येऊन 71 आणि 65 धावा करणार्‍या अय्यरचे शास्त्री यांनी तोंडभरून कौतुक केले आहे. रिषभ पंत मात्र चौथ्या स्थानावर अपयशी ठरला आहे.

श्रेयस गेम चेंजरची भूमिका पार पाडू शकतो – कोहली

श्रेयस अय्यरच्या फलंदाजीतील धडाका पाहता तो लढतीत गेम चेंजर खेळाडूची भूमिका पार पाडू शकतो. विश्वचषकात आलेली यशाची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला अय्यरसारख्या फलंदाजाची गरज आहे, अशा शब्दांत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने श्रेयसच्या खेळाचे कौतुक केले. श्रेयसमध्ये कोणत्याही क्रमांकावर संघाला यश मिळवून देण्याची क्षमता आहे, असेही कौतुक कर्णधार विराटने केले.

आपली प्रतिक्रिया द्या