आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा – हिंदुस्थानी महिलांचा ‘सुवर्ण पंच’

हिंदुस्थानच्या युवा महिला बॉक्सर्सनी मॉण्टेनेग्रो येथे पार पडलेल्या निमंत्रितांच्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांना दमदार पंचेस लगावत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या स्पर्धेत हिंदुस्थानी महिलांनी पाच सुवर्ण, तीन रौप्य व दोन कांस्य पदकांसह एकूण 10 पदकांवर मोहोर उमटवली आणि तालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली. उझ्बेकिस्तानने दोन सुवर्ण पदकांसह दुसरे आणि झेक प्रजासत्ताकने एका सुवर्ण पदकासह तिसरे स्थान पटकावले.

हिंदुस्थानच्या खेळाडूंनी स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी दिमाखदार कामगिरी केली. बेबीरोजिसाना चानू हिने 51 किलो वजनी गटात आणि अरुंधती चौधरी हिने 69 किलो वजनी गटात प्रतिस्पर्ध्यावर मात करीत गोल्ड मेडल जिंकले. लकी राणाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अरुंधती चौधरीने युव्रेनच्या मेरियाना स्टोयकोला 5-0 असे हरवले. बेबीरोजिसाना चानूने उझ्बेकिस्तानच्या सबिना बोबोपुलोवा हिचे कडवे आव्हान 3-2 अशा फरकाने परतवून लावले. मात्र 64 किलो वजनी गटात लकी राणाला लिया पुकिला हिच्याकडून 5-0 अशी हार सहन करावी लागली.

युवा जागतिक स्पर्धेची तयारी

हिंदुस्थानच्या युवा पुरुष खेळाडूंनी दोन पदके जिंकत एपूण 12 पदकांसह तालिकेत दुसरे स्थान पटकावले. या गटात उझ्बेकिस्तानने पहिले आणि युव्रेनने तिसरे स्थान पटकावले. पोलंडमध्ये 10 ते 24 एप्रिल या कालावधीत युवा जागतिक बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने हिंदुस्थानच्या युवा खेळाडूंना पोलंडमधील स्पर्धेसाठी चांगली तयारी करता आली.

आपली प्रतिक्रिया द्या