हिंदुस्थानी महिला संघ सात वर्षांनंतर कसोटी सामना खेळणार

हिंदुस्थानचा महिला क्रिकेट संघ तब्बल सात वर्षांनंतर कसोटी सामना खेळणार आहे. हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामध्ये या वर्षी 16 ते 19 जून या कालावधीत हा सामना रंगणार आहे. याआधी 2014 साली हिंदुस्थानच्या महिला संघाने अखेरचा कसोटी सामना खेळला होता. हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये मैसूर येथे हा सामना खेळवण्यात आला होता.

इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाकडून मंगळवारी हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामधील क्रिकेट मालिकेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली. दोन संघांमध्ये एक कसोटी, तीन वन डे व तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्यात येणार आहे. 16 जून रोजी या दौऱयाला सुरुवात होईल. 15 जुलै रोजी अखेरच्या टी-20 लढतीने या दौऱयाचा शेवट होणार आहे.

2022 मधील वर्ल्ड कपची तयारी

इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाकडून 2022 सालामध्ये होणाऱया वर्ल्ड कपची तयारी करण्यात आली आहे. पुढील 12 महिन्यांच्या क्रिकेट वेळापत्रकाचा आराखडा यावेळी त्यांच्याकडून तयार करण्यात आला आहे. हिंदुस्थानविरुद्ध मालिका तसेच हंड्रेड सीरिज यांच्याव्यतिरिक्त न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटू खेळताना दिसणार आहेत. दोन देशांमध्ये तीन टी-20 व पाच वन डे सामन्यांची मालिका खेळविण्यात येणार आहे. तसेच ऑक्टोबर महिन्यात इंग्लंडचा महिला संघ पाकिस्तान दौऱयावरही जाणार आहे.

हिंदुस्थानी महिला संघाचा इंग्लंड दौरा

एकमेव कसोटी
16 ते 19 जून, ब्रिस्टॉल
पहिली वन डे
27 जून, ब्रिस्टॉल
दुसरी वन डे
30 जून, टाँटन
तिसरी वन डे
3 जुलै, वॉरसेस्टर
पहिली टी-20
9 जुलै, नॉर्दनम्टन
दुसरी टी-20
11 जुलै, होव
तिसरी टी-20
15 जुलै, चेल्म्सपर्ह्ड

आपली प्रतिक्रिया द्या