हिंदुस्थानी महिलांची उपांत्य फेरीत धडक

indian-women-cricket-team

हिंदुस्थान-मलेशियादरम्यानचा आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेटचा उपांत्यपूर्व सामना पावसामुळे अर्धवट अवस्थेत रद्द करावा लागला. मात्र, सरस क्रमवारीच्या जोरावर हिंदुस्थानी महिलांनी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली.

या स्पर्धेत थेट उपांत्यपूर्व लढतीत प्रथमच मैदानावर उतरलेल्या हिंदुस्थानी महिला संघाने मलेशियाविरुद्ध 173 धावा केल्या. पावसामुळे सामना 15 षटकांचा करण्यात आला. प्रत्युत्तरादाखल मलेशिया संघाला दोन चेंडूंत केवळ एक धाव करता आली. त्यानंतर पाऊस सुरू झाल्याने पुढील खेळ होऊ शकला नाही. यानंतर सामना रद्द करण्यात आला आणि हिंदुस्थानने सरस क्रमवारीच्या आधारे उपांत्य फेरी गाठली.

सततच्या पावसामुळे बराच वेळ वाया गेला आणि आता सामना रद्द करण्यात आला आहे. क्रमवारीतील वर्चस्वामुळे ‘टीम इंडिया’ने उपांत्य फेरी गाठली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत अव्वल मानांकित ‘टीम इंडिया’ला थेट उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळण्याची संधी मिळाली. मलेशियाविरुद्धच्या सामन्यात ‘टीम इंडिया’ने चांगली कामगिरी केली. संघाची नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर बंदीमुळे हा सामना खेळू शकली नाही. त्यामुळे स्मृती मानधनाने संघाची कमान सांभाळली.

हिंदुस्थानने प्रथम फलंदाजी करत शानदार सुरुवात केली, मात्र स्मृती मानधना 16 चेंडूंत 27 धावा करून बाद झाली. पावसामुळे सामना प्रत्येकी 15 षटकांचा करण्यात आला. अशा परिस्थितीत शेफाली वर्मा आणि जेमिमाह रॉड्रिग्ज यांनी शानदार फलंदाजी करत 86 धावांची भागीदारी केली. शेफाली 39 चेंडूंत 67 धावा करून बाद झाली. जेमिमा 29 चेंडूंत 47 धावा करून नाबाद राहिली. शेवटी ऋचा घोषने 7 चेंडूंत नाबाद 21 धावा करत हिंदुस्थानची धावसंख्या 173/2 पर्यंत नेली.

डकवर्थ-लुईस नियमानुसार

मलेशियासमोर 15 षटकांत 177 धावांचे लक्ष्य होते. मलेशियाने दोन चेंडूंत एक धाव घेतली होती, मात्र त्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाल्याने पुढील खेळ होऊ शकला नाही. शेवटी सामना रद्द झाला आणि हिंदुस्थानला पुढे चाल देण्यात आली. आता ‘टीम इंडिया’ 24 सप्टेंबरला उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे.