हिंदुस्थानच्या महिलांनी बेल्जियमच्या पुरुषांना रोखले, हॉकीमध्ये बरोबरी

40

सामना ऑनलाईन, ऍण्टवर्प

युरोप दौऱ्यावर असलेल्या हिंदुस्थानी महिला हॉकी संघाने ऍण्टवर्प येथील चुरशीच्या लढतीत बेल्जियमच्या ज्युनियर पुरुष संघाला २-२ असे बरोबरीत रोखत हॉकी शौकिनांना खूश केले. राणी रामपालच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी हॉकी संघाने लढतीच्या आरंभापासूनच सकारात्मक खेळ करीत यजमान पुरुष संघाला अटीतटीची झुंज दिली.

हिंदुस्थानी कर्णधार राणीच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी हॉकी संघाने बेल्जियमच्या ज्युनियर पुरुष संघाविरुद्ध सुरुवातीच्या मिनिटांतच दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळवले, पण बेल्जियम गोलरक्षकाने हिंदुस्थानी महिलांची दोन्ही आक्रमणे फोल ठरवली. त्यानंतर सहा मिनिटांत यजमान बेल्जियम संघाने ३ पेनल्टी कॉर्नर्स मिळवले. पण हिंदुस्थानी गोलरक्षक सविताने तिन्ही आक्रमणे समर्थपणे परतावत संघावर गोल होऊ दिला नाही.

दुसऱ्या सत्रात बेल्जियमच्या स्टॅन ब्रॅनिकीने १९व्या मिनिटाला यजमानांना १-० असे आघाडीवर नेले. त्यानंतर तिसऱ्या सत्रात ३६ व्या मिनिटाला निक्की प्रधानने हिंदुस्थानला १-१ अशी बरोबरी साधून दिली. हे सत्र हिंदुस्थानी महिलांनी गाजवले. मध्यरक्षक नेहा गोयलचा अफलातून फटका बेल्जियम गोलरक्षकाने सुरेखरीत्या अडवला. अन्यथा हिंदुस्थानने आघाडी घेतली असती. ४३ व्या मिनिटाला बेल्जियम आक्रमकांनी संधी साधली. त्यांच्या मथोऊ डी लाएटने अफलातून मैदानी गोल नोंदवत संघाला २-१ असे आघाडीवर नेले.

वंदनाच्या गोलने बरोबरी
चौथ्या सत्रात नियमित हिंदुस्थानी गोलरक्षक रजनी एटीमाटपुणे अफलातून गोरक्षकाचा नमुना पेश केला. तिला बचावपटू सुनीता लाक्राची अफलातून साथ लाभली. अखेरच्या काही मिनिटांत हिंदुस्थानी फॉरवर्डस्नी पुन्हा उसळी घेतली. वंदना बटारियाने ५४ व्या मिनिटाला बेल्जियम गोलवर यशस्वी आक्रमण रचत हिंदुस्थानला २-२अशी बरोबरी साधून दिली. आता १४ सप्टेंबरल हिंदुस्थानी महिला संघ डेन बॉश महिला संघाविरुद्ध झुंजणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या