…तर देशाच्या रक्षणासाठी लष्कर सीमेपारही धडक देईल! पाकला राजनाथ सिंह यांचा इशारा

657

सीमेपलीकडून होणारे दहशतवादी हल्ले यापुढे हिंदुस्थान मुळीच सहन करणार नाही. आमच्या देशाच्या सुरक्षेला धक्का लावण्याचा कुणी प्रयत्न केला तर दहशतवाद्यांचा समूळ बिमोड करण्यासाठी आमचे लष्कर सीमेपारही धडक देईल, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे नाव घेता दिला. बालाकोट सर्जिकल स्ट्राईकच्या पहिल्या वर्षपूर्ती सोहोळ्यात ते बोलत होते.

हिंदुस्थानी हवाई दलाच्या बहाद्दर वैमानिकांनी गेल्या वर्षी 26 फेब्रुवारीला थेट पाकिस्तानातील बालाकोट येथे हवाईमार्गे धडक मारीत मोठा बॉम्बवर्षाव केला होता. या हल्ल्यात लश्कर-ए-तोयबाचे प्रशिक्षण शिबीर उद्ध्वस्त झाले होते. पुलवामातील सीआरपीएफ ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी हिंदुस्थानने बालाकोट सर्जिकल स्ट्राईक घडवला होता. पुलवामा हल्ल्यात हिंदुस्थानचे 40 जवान शहीद झाले होते.

यापुढे जशास तसे उत्तर देऊ!
हिंदुस्थानी सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल. आमच्या लष्करी जवानांच्या सांडलेल्या रक्ताच्या एकेक थेंबाचा हिशेब आम्ही प्रतिहल्ल्याने चुकता करू असे सांगून राजनाथ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्थानी लष्कराला दहशतवादाविरोधातील कारवायांना मोकळीक दिल्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो. कारण हिंदुस्थानी लष्कर दहशतवाद्यांचे कंबरडे मोडायला सक्षम आहे.

आपली प्रतिक्रिया द्या