चाबहार बंदरावर अमेरिकी बंदीचा परिणाम नाही, हिंदुस्थानला दिलासा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

चाबहार बंदर या हिंदुस्थानच्या इराणमधील प्रकल्पावर आपल्या बंदीचा परिणाम होणार नाही, असे अमेरिकेने बुधवारी स्पष्ट केल्याने हिंदुस्थानला मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने सोमवारी हिंदुस्थान आणि चीनसहीत आठ राष्ट्रांना इराणकडून कच्चे तेल घेण्यास प्रतिबंध घातला आहे. मात्र हिंदुस्थान आणि इराण यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या चाबहार बंदर परियोजनेवर या बंदीचा काहीच परिणाम होणार नाही, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.

ओमानच्या खाडीमध्ये सुरू असलेल्या या पोर्ट प्रकल्पाबाबत हिंदुस्थानची भूमिका अमेरिकेला मान्य आहे हेच यावरून दिसून येते. एकीकडे अमेरिकेने इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रतिबंध लादलेला असला तरी हिंदुस्थानच्या साथीने इराण करत असलेल्या या प्रकल्पाबाबत अमेरिकेला काहीच म्हणायचे नाही. हा बंदर प्रकल्प अफगाणिस्तानच्या विकासासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो. मात्र या बंदरामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार आहे.