एक पाऊल पुढे!

37

<नमिता वारणकर>

तृतीयपंथीयएक उपेक्षित, लोकांच्या टिंगलटवाळीचा, हसण्याचा विषयमात्र प्रीतिका याशिनी या तामीळनाडूतील एका तृतीयपंथीयाने सरकारी आणि न्यायालयीन प्रक्रियांना तोंड देत  चक्क पोलिसाची वर्दी घातली आहे. ती देशातली पहिली  उपनिरीक्षक बनली आहेतृतीयपंथीय समाजातील अनेकांचे आयुष्य बदलवणारी ही घटना आहे.

 प्रीतिका याशिनीचे शाळेतले नाव प्रदीपकुमार. शाळेत असतानाच शरीरात झालेल्या बदलांमुळे वैद्यकीय तपासणीनंतर ती तृतीयपंथीय असल्याचे लक्षात आले. तिच्यामुळे तिच्या कुटुंबीयांना खूप टीका सहन करावी लागली. लोकांच्या टीका, मस्करीला कंटाळून तिने घर सोडले. तरीही शिक्षण सुरूच ठेवून कॉम्प्युटर ऑप्लिकेशनचा कोर्स केला. त्यानंतर केलेल्या लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर प्रदीपकुमार हे नाव बदलून प्रीतिका याशिनी या नावाने तिने नवीन जीवन जगण्यास सुरुवात केली.

तामीळनाडूच्या पोलीस अकादमीमध्ये उपनिरीक्षकपदाचा एक वर्षाचा अभ्यासक्रम तिने आपली  ओळख न लपवता पूर्ण केला. या अभ्यासक्रमाच्या परीक्षेला बसण्यासाठी तिला खूप झगडावे लागले. पोलीस उपनिरीक्षकाच्या परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षकाच्या भरती फॉर्ममध्ये तृतीयपंथीयांसाठी वेगळा रकाना नाही, त्यांच्यासाठी कोटा नाही, त्यांची शारीरिक तपासणी आणि मुलाखतीची व्यवस्था नाही अशी अनेक कारणे देऊन प्रीतिकाचे आवेदनपत्र पोलीस भरती बोर्डाने नाकारले असे प्रीतिका सांगते.

आवेदनपत्र नाकारल्यामुळे प्रीतिकाने कायदेशीर लढाई लढायचे ठरवले.  याकरिता तिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

तृतीयपंथीयांनाही सर्व योजनांचे लाभ मिळावेत असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असल्याचे तिने दाखवून दिले म्हणून तृतीयपंथीयही पोलीस उपनिरीक्षकपदासाठी पात्र आहेत असे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाने तामीळनाडू सेवा भरती बोर्डाला दिले. एवढेच नाही तर पुढच्या वेळी होणाऱया भरती प्रक्रियेवेळी तृतीयपंथीयांनाही सहभागी करून घेतले जाईल असा आदेश न्यायाधीशांनी दिला आहे.

आयपीएसहोण्याचे स्वप्न

ट्रेनिंगच्या काळात तिला तिच्या सहकाऱयांनी मोलाचे सहकार्य केले. तामीळनाडूच्या पोलीस दलामध्ये नव्याने सामील होणाऱया पोलीस अधिकाऱयांच्या पासिंग आऊट परेडमध्ये ती सहभागी झाली होती.

एक यशस्वी ‘आयपीएस’ अधिकारी होण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी मी माझे काम संपल्यानंतर मिळालेल्या वेळेत तयारी करते. शिवाय ‘आयएएस’चाही अभ्यास करत असल्याचे ती सांगते.

समाजाने मानसिकता बदलावी

तृतीयपंथीय हळूहळू समाजातील मुख्य प्रवाहात येत आहेत. त्यांना कायदेशीर मान्यता जरी मिळाली असली तरीही याकरिता त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागत आहे, यापुढेही करावा लागणार आहे. कारण त्यांच्याप्रति लोकांची मानसिकता अजूनही पूर्णपणे बदललेली नाही. समाजात मिसळून काम करणे हे आपल्यासाठी एक आव्हान आहे. या आव्हानांचा सामना करत करतच आपल्याला समाजात स्थान मिळवायचे आहे. म्हणून तृतीयपंथीयांनी आपले मानसिक धैर्य खचू देऊ नये,  असा सल्ला प्रीतिका आपल्या समाजाला देते.    

झोकून देऊन काम करणार!

तामीळनाडूतील धरमपूर जिह्यात प्रीतिका आपली उपनिरीक्षकपदाची जबाबदारी सांभाळत आहे. आपल्या निवडीविषयी प्रीतिका सांगते, ‘‘माझे वरिष्ठ आणि जनतेचे संपूर्ण समाधान करण्यावर माझा भर राहील. यासाठी मी झोकून देऊन काम करणार असून महिलांचे हक्क आणि त्यांच्यावर होणाऱया अत्याचारांविरुद्ध कठोर भूमिका घेणार आहे. प्रथम तृतीयपंथीय पोलीस अधिकारी होण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले.’’

 

आपली प्रतिक्रिया द्या