लँडिंगच्या वेळी गारपीट झाल्याने विमानाच्या काचा फुटल्या, हैदराबाद विमानतळावरील घटना

खराब हवामानाचा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना आणि सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. मात्र हैदराबाद विमानतळावरील एक विमानही खराब हवामानाच्या तडाख्यात सापडले. लँडिंगच्या वेळी जोरदार गारपीट झाल्यामुळे विमानाचे मोठे नुकसान झाले. या गारपिटीमुळे फ्लाइटच्या लँडिंगमध्ये कोणतीही अडचण आली नाही, तसेच विमानातील प्रवासी आणि चालक दलातील सदस्यही पूर्णपणे सुरक्षित आहेत. मात्र विमानाच्या काचा फुटल्यामुळे काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

हैदराबाद विमानतळावर शनिवारी ही घटना घडली. फ्लाइट क्रमांक 6E 6594 हे विमान अहमदाबादहून हैदराबादला जात होते. हैदराबादच्या शम्साबाद विमानतळावर लँड करत असताना विमानाला गारपिटीचा तडाखा बसला. त्यामुळे विमानाच्या रेडोम आणि विंडशील्डचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या घटनेनंतर विमान दुरुस्तीसाठी नेण्यात आले. ही घटना घडली त्यावेळी हवामान खूपच खराब असल्याचे सांगण्यात येत आहे. जोरदार वारा आणि विजांचा कडकडाट सुरु होता. त्यात गारपीट झाल्याने विमानाचे नुकसान झाले.