संसदीय स्थायी समितीने इंडिगो एअरलाईन्सला फटकारले

27

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचारी व केबिन क्रूने प्रवाशांसोबत केलेल्या गैरवर्तणूकीवरून शुक्रवारी संसदीय स्थायी समितीने इंडिगो एअरलाईन्सला चांगलेच फटकारले आहे. समितीने इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सवयी सुधारण्याची ताकिद देऊन प्रवाशांसोबत चांगले वर्तणूक ठेवण्याचे आदेश दिले आहेत. समितीने आज इंडीगो एअरलाईन्सबाबत अहवाल राज्यसभेत सादर केला. या अहवालात इंडिगो एअरलाईन्सवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.

गेल्या महिन्यात इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी एका ज्येष्ट नागरिकाला ट्रान्सपोर्ट बसमध्ये चढू दिले नव्हते. त्यावेळी या वृद्धाला जमिनीवर देखील ढकलण्यात आले होते. त्यानंतर प्रसिद्ध बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने देखील इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तणूकीबद्दल ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली होती. गेल्या काही महिन्यात इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्याच्या उद्धटपणाच्या आणि गैरवर्तणूकीचे बरेच प्रकार घडले आहेत. त्यावरून आज संसदीय स्थायी समितीने इंडिगो एअरलाईन्सला समज दिली.

इतर एअरलाईन्सचे कर्मचारी प्रवाशांसोबत अत्यंत नम्रपणे वागतात पण इंडिगो एअरलाईनचे कर्मचारी हे प्रवाशांना अतिशय तुच्छपणे वागणूक देतात असे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारचे गैरवर्तणूक खपवून घेतले जाणार नाही त्यामुळे यापुढे इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांसोबत नम्र वागावे. अन्यथा एअलाईन्सवर कारवाई करण्यात येईल. असा इशारा संसदीय समितीने इंडिगो एअरलाईन्सला दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या