राहुल गांधींनी जीभ चावली, इंदिराजींच्या ऐवजी केला अम्मांचा उल्लेख 

19

सामना ऑनलाईन । बंगळुरु

काँग्रेसनं उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या हस्ते केवळ १० रुपयात जेवण देणारी ‘इंदिरा कँटीन’ कर्नाटकात सुरू करण्यात आली. मात्र अनेकदा आपल्याच शाब्दिक चुकांमुळे अडचणीत सापडणारे राहुल गांधी पुन्हा एक चूक करून बसले. त्यांनी ‘इंदिरा कँटीन’ उच्चारण्या ऐवजी ‘अम्मा कँटीन’ असा उच्चार केला आणि फसले. त्यामुळे सोशल मीडियावर ते चर्चेचा विषय बनले.

तमिळनाडूतील ‘अम्मा कँटीन’च्या धर्तीवर कर्नाटकात ‘इंदिरा कँटीन’ सुरू करण्यात आली आहेत. या कँटीनमधून केवळ ५ रुपयांत नाश्ता आणि १० रुपयांत पोटभर जेवण मिळणार आहे. ‘या कँटीनची कल्पना ही काँग्रेस सरकारची असल्याचा गर्व आहे’ असं राहूल यांनी यावेळी सांगितलं आणि ‘इंदिरा कँटीन’ ऐवजी ते अम्मा कँटीन बोलून गेले. अखेर चूक सुधारत त्यांनी ‘इंदिरा कँटीन’ असा उल्लेख केला.

दरम्यान, पहिल्या टप्प्यात बंगळुरूमध्ये १०१ इंदिरा कँटीन उघडण्यात आले आहेत. या कँटीनमध्ये ५ रुपयांत शाकाहारी नाश्ता, १० रुपयांत दुपारचे आणि रात्रीचे जेवण मिळणार आहे. ऑक्टोबरमध्ये महात्मा गांधी यांची १४८ वी जयंती आहे. त्यानिमित्त बंगळुरूमधील ९७ वॉर्डात आणखी काही ‘इंदिरा कँटीन’ उघडण्यात येणार आहेत.
indira-canteen
कर्नाटक सरकारने २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी १९८ वॉर्डात तमिळनाडूतील ‘अम्मा कँटीन’च्या धर्तीवर ‘इंदिरा कँटीन’ सुरू करण्यासाठी अर्थसंकल्पात १०० कोटींची तरतूद केली आहे.
आणखी एक चूक
राहुल गांधी याच भाषणात बोलताना आणखी एक चूक करून गेले. कर्नाटकातील अन्य शहरं असा उल्लेख करण्याऐवजी ते बंगळुरूतील अन्य शहर असं म्हणाले. त्यामुळे राहुल गांधी यांच्या विरोधकांना टीका करण्याची आणखी एक संधी मिळाली.
आपली प्रतिक्रिया द्या