शॉर्ट्स, हाताला फ्रॅक्चर, शरीरावर जागोजागी पट्ट्या अशा अवस्थेत नवरा पोहोचला मांडवात

लग्न म्हंटली की नवरा-नवरीची आणि कुटुंबीयांची लगीनघाई आधी कपड्यांपासून सुरू होते. मात्र इंडोनेशियात एक नवरा शॉर्ट्स, हाताला फ्रॅक्चर, शरीरावर जागोजागी पट्ट्या अशा अवस्थेत मांडवात बसला होता. वधू एवढ्या सुंदर कपड्यात बसलेली असताना वर असा का बसला असावा असा प्रत्येकालाच प्रश्न पडला होता. सध्या या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर जबरदस्त शेअर होत असून सर्वांमध्येच त्याची चर्चा सुरू झाली आहे.

हे फोटो इंडोनेशियातल्या एका लग्नाचे आहेत. ज्यामध्ये वधू सजून भरजरी कपड्यांमध्ये दिसत आहे तर वर शॉर्ट्स, हाताला फ्रॅक्चर, शरीरावर जागोजागी पट्ट्या अशा भयंकर अवस्थेत बसलेला दिसत आहे. वराचे असे फोटो पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. झाले असे की हा वर लग्नाच्या चार दिवसांपूर्वी मोटर सायकलने जात असताना त्याचा जबरदस्त अपघात झाला. अपघात इतका जबरदस्त होता की त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे हा वर अशा अवस्थेत दिसत आहे.

हे फोटो पाहून काही युझर्सचे म्हणणे आहे की बरे झाल्यावर लग्न करायला हवे होते. एवढी घाई काय होती. लग्नाचे हे फोटो ट्विटर यूजर @br0wski ने 2 एप्रिल रोजी शेअर केले आहेत. त्यांच्या या पोस्टला 4.5 हजार लाइक्स आणि अडीच हजारपेक्शा जास्त रिट्विट मिळाले आहे. याबरोबरच शेकडो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

इंडोनेशियाच्या ईस्ट जावा परिसरात हे लग्न झाले आहे. यामध्ये वर कपड्यांच्या नावाने फक्त शॉर्ट्स घातली आहे. त्यांच्या शरीरावर भरपूर बॅंडेज पण पाहायला मिळत आहेत. तर त्याच्या एका हातावर प्लास्टर लावलेले आहे. kompas.com नुसार वराला काहीच पर्याय नसल्याने अशापद्धतीने लग्न करावे लागले. वधू एलिंदा द्वी क्रिस्तीआनी ने मीडियाशी बोलताना सांगितले की, वर सुप्रप्टो हा लग्नासाठी बनवलेला खास ड्रेस त्याच्यावर झालेल्या खांद्याच्या शस्त्रक्रियेमुळे घालू शकलेला नाही. काहीजण या लग्नाचे फोटो पाहून खिल्ली उडवत आहेत मात्र काहींनी या वराची पाठ थोपटत वराच्या हिंमतीला दाद दिली आहे. अशा परिस्थितीत लग्न करणं मोठी गोष्ट असल्याने त्याचे कौतुकही होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या