हवा आली, दिवस गेले! तरुणीची हवा हवाई…

हवेची झुळूक आली, या झुळूकेने गुप्तांगाला स्पर्श केला आणि एका तासात आपण बाळाला जन्म दिला अशी अजब कहाणी एका महिलेने सांगायला सुरुवात केली आहे.  सिती झैना असं या महिलेचं नाव असून ती इंडोनेशियाची रहिवासी आहे. सितीने दावा केला आहे की ती घरामध्ये प्रार्थना करत असताना तिच्यासोबत हा प्रकार घडला आहे.  या चमत्कारीक गर्भधारणेच्या आणि प्रसुतीच्या दाव्याची बातमी काही तासांतच संपूर्ण इंडोनेशियात पसरली असून अनेकांनी या महिलेच्या दाव्याची थट्टा उडवायला सुरुवात केली आहे.

महिलेच्या दाव्याची बातमी वणव्यासारखी पसरल्यानंतर इंडोनेशियातील सरकारी अधिकाऱ्यांनी ही महिला खोटं बोलत असल्याचं सिद्ध करण्यासाठी एक चौकशी पथक नेमलं आहे. ही महिला जिथे राहाते तिथल्या सरकारी आरोग्य केंद्राचे अधिकारी इमान सुलेमान यांनी या महिलेची स्वत: भेट घेतली. त्यांनी सितीची चौकशी केली ज्यात त्यांना कळालं की सिती तिच्या नवऱ्यापासून 4 महिन्यांपूर्वी विभक्त झाली होती आणि तिला विभक्त झालेल्या नवऱ्यापासून एक मूल आहे. सुलेमान यांनी सितीची चौकशी केल्यानंतर म्हटलंय की सिती ही पूर्वीच गर्भवती राहिली असावी, मात्र अनेकदा महिलांना त्या गर्भवती असल्याचे कळत नाही. या अवस्थेला क्रिप्टीक प्रेग्नन्सी असा इंग्रजी शब्द असून अशा प्रकारच्या गर्भवती महिलांना त्या गर्भार असल्याची कोणती लक्षणेही दिसत नाही. महिलांना कोणत्याही प्रसववेदनाही होत नाही आणि बाळ जन्माला आल्यानंतरच त्यांना कळतं की त्या गर्भवती होत्या.

काहींनी आरोप करायला सुरुवात केली आहे की सितीने रचलेलं कुभांड आहे. सितीचे विवाहबाह्य संबंध असावेत आणि त्यातूनच हे मूल जन्माला आलं असावं असा सितीवर आरोप करण्यात आला आहे.  लोकांकडून होणारी निंदा टाळण्यासाठी सितीने हा बनाव रचला असावा असं तिच्यावर टीका करणाऱ्यांचं म्हणणं आहे.  पोलिसांनीही या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून त्यांनी सर्व बाजू लक्षात घेतल्या आहेत. हे मूल पहिल्या नवऱ्यापासून झालं असावं ही शक्यताही त्यांनी चौकशीदरम्यान ग्राह्य धरली आहे.  हवेमुळे गर्भवती झाल्याचा आणि काही तासांत प्रसुती झाल्याचा सितीने जो दावा केला आहे त्यामुळे जे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं असून ते दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचं तिथल्या स्थानिक प्रशासनाचे प्रमुख सुमाद्री यांनी म्हटलं आहे. या घटनेमुळे अफवा पसरत असून त्या पसरू नयेत यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या