डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बनविण्याचे काम चिनी कंपनीला नको

346

कोरोनाच्या संसर्गामुळे चीनमधील व्यापार आणि कामकाज गेले काही दिवस ठप्प आहे. या पार्श्वभूमीवर इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील आंबेडकरांचा पुतळा बनविण्याचे चिनी कंपनीला दिलेले काम त्वरित रद्द करून त्याऐवजी हिंदुस्थानातील एखाद्या कंपनीला हे काम दिल्यास कामाचा वेग वाढेल, अशी सूचना खासदार राहुल शेवाळे यांनी संबंधित यंत्रणांना मंगळवारी केली.

दादरच्या इंदू मिल परिसरात उभारल्या जाणाऱया भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी स्मारक परिसरात आयोजित केलेल्या बैठकीत खासदार शेवाळे यांनी ही सूचना केली. यावेळी एमएमआरडीएचे अधिकारी, शिल्पकार अनिल सुतार, प्रकल्प सल्लागार शापूरजी पालनजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे अध्यक्ष महेंद्र साळवे, सरचिटणीस नागसेन कांबळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार हा पाहणी दौरा मंगळवारी आयोजित करण्यात आला होता.

इंदू मिल परिसरातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळय़ाचे शिल्पकार राम सुतार हे असून प्रत्यक्ष पुतळा बनविण्याचे काम प्रकल्प सल्लागाराच्या वतीने ‘ल्यू याँग’ या चायनीज कंपनीला देण्यात आले होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून करोना विषाणूच्या संसर्गामुळे हादरलेल्या चीनमधील सर्व व्यापार आणि कारखाने ठप्प आहेत. यामुळे पुतळा बनविण्याच्या कामाला विलंब होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या