इंदु सरकार अडकणार? ‘तिची’ न्यायालयात धाव

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र व काँग्रेस नेते संजय गांधी यांची कन्या असल्याचा दावा करणाऱ्या एका महिलेने इंदु सरकार या चित्रपटाविरोधात दिल्लीतील न्यायालयात धाव घेतली आहे. प्रिया सिंह पॉल (४८) असे तिचे नाव आहे.

या चित्रपटात संजय गांधी व इंदिरा गांधी यांची छबी चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा दावा पॉल यांनी केला आहे. दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केली असून यात त्यांनी मधुर भांडारकर यांच्या इंदु सरकार चित्रपटात संजय गांधी यांनी दत्तक मुलं घेतल्यासंदर्भात दाखवण्यात आलेली कागदपत्रे बोगस असल्याचा आरोप केला आहे. यामुळेच आपल्याला तोंड उघडावे लागत असल्याचेही त्या म्हणाल्या.

या चित्रपटाला प्रमाणपत्र दिल्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतला असून त्यासंदर्भात सेन्सॉर बोर्डाला पत्रही लिहले आहे.
इंदु सरकार या चित्रपटात आपल्या पिताची चुकीची प्रतिमा रंगवण्यात आली आहे. यामुळेच त्याविरोधात आपण न्यायालयात धाव घेतल्याचं पॉल यांनी पत्रकारांना सांगितलं आहे. इंदु सरकार हा चित्रपट ३० टक्के सत्य व ७० टक्के काल्पनिक कथेवर तयार करण्यात आला आहे. ज्यात चित्रपट रंजक बनवण्यासाठी सत्याचीही तोडफोड करण्यात आली असा आरोप त्यांनी केला आहे.

संजय गांधी यांचा जवळचा मित्र असलेल्या सुशील गोस्वामी महाराज यांनी न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केल असून त्यात त्यांनी संजय गांधी यांना विवाहाआधीच एक मुलगी असल्याचं आपल्याला माहीत होतं असं म्हटल आहे. तसेच मोठे झाल्यावरच संजय गांधी आपले पिता असल्याचं कळालं, असं प्रिया यांनी म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या