‘इंदू सरकार’वर काँग्रेसची आणीबाणी, शो बंद पाडले

13

सामना प्रतिनिधी । ठाणे

‘आणीबाणी’ सारख्या ज्वलंत विषयांना हात घातल्याने प्रदर्शनाआधीपासूनच वादात सापडलेल्या मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंदू सरकार’ चित्रपटाचा शो कल्याणमध्ये काँग्रेसने बंद पाडला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम हा चित्रपट करीत असल्याचे सांगत कल्याण जिल्हा काँग्रेसतर्फे हे आंदोलन करण्यात आले.

कल्याणच्या मेट्रो मॉलमधील आयनॉक्स थिएटरमध्ये सकाळी १०:१५ वा. सिनेमाचा पहिला शो होता. शो सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते थिएटरमध्ये घुसले आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली. “मोदी सरकार हाय हाय, मधुर भांडारकर हाय हाय..जब तक सूरज चांद रहेगा, इंदिरा तेरा नाम रहेगा” अशा घोषणा देत हा शो बंद पाडला. तसेच मधुर भांडारकरच्या फोटोला चपला मारून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला राग व्यक्त केला.

भाजपच्या सांगण्यावरून हा चित्रपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटातून इंदिरा गांधींची प्रतिमा मलिन करण्याचं काम करण्यात आले असून हा मधुर नव्हे तर मोदी भांडारकर असल्याची टीका काँग्रेसने केली. दरम्यान कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतले. ठाण्यातही कोरम मॉलमधील आयनॉक्स थिएटरमधील आणि इटरनिटी मॉलमधील शो काँग्रेस कार्यकर्त्यांनी बंद पाडले.

आपली प्रतिक्रिया द्या