नगरमध्ये तृप्ती देसाई यांना विरोध, इंदुरीकर महाराजांच्या समर्थकांनी दाखवले काळे झेंडे

1395

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांचे मंगळवारी नगरमध्ये आगमन झाले. यावेळी सुपा येथे त्यांना इंदुरीकर महाराजांच्या समर्थकांनी काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला. या दरम्यान मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये तृप्ती देसाई यांना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आणण्यात आले. यावेळी प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांना तृप्ती देसाई यांनी निवेदन दिले. इंदुरीकर महाराज यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करवा अशी मागणी केली असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास मुंबईत तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

गेल्या आठ दिवसापासून इंदुरीकर महाराज यांनी केलेले सम-विषम तारखेसंदर्भातील वक्तव्य चांगलेच गाजत आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी इंदुरीकर महाराज यांनी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे पत्रकाद्वारे म्हटले. दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी यापूर्वी मी नगर येथे जाऊन पोलिसांना निवेदन देणार असल्याचे जाहीर केले होते. मंगळवारी तृप्ती देसाई नगरमध्ये येणार असल्याने कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिल्यानंतर तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे की, इंदुरीकर महाराजांनी महिलांचा केलेला अवमान आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. त्यांचे कुठलेही वक्तव्य आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. इंदुरीकर महाराजांनी पीसीएमटी कायदा 2003 चे उल्लंघन केले आहे, असेही तृप्ती देसाई यावेळी म्हणाल्या.

त्याच्यावरही गुन्हा दाखल करा

इंदुरीकर महाराजांच्या समर्थकांनी माझे अनेक प्रकारचे व्हिडीओ, फोटो एडीट करून बदनामी सुरू केली आहे. मला त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे अशा व्यक्तींवरही सुद्धा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितले.

… तर मुंबई येथे तीव्र आंदोलन छेडणार

इंदुरीकर महाराजांनी दिलगिरी व्यक्त केली असे विचारल्यावर तृप्ती देसाई यांनी म्हटले की, दिलगिरी व्यक्त केली आहे, मात्र दिलगिरी व्यक्त करून काही उपयोग नाही. त्यांनी यापुढे मी असे वक्तव्य करणार नाही. महिलांचा कोणता अवमान करणार नाही असे त्यांनी लिहून दिले पाहिजे, असेही त्या यावेळी म्हणाल्या. तसेच इंदुरीकर महाराजांवर गुन्हा लवकरात लवकर दाखल झाला नाही तर मुंबई येथे तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कायदेशीर बाबी तपासून कारवाई!

तृप्ती देसाई यांनी आपल्याला आज निवेदन दिले आहे. यासंदर्भात कायदेशीर बाबी तपासून पुढील कारवाई केली जाईल, अशी स्पष्टोक्ती प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी दिली आहे. सिव्हील सर्जन यांनी या संदर्भामध्ये चौकशी सुरू केली आहे. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या