औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न

501

>>पुरुषोत्तम आठलेकर

औद्योगिक सुरक्षा दिन शनिवारी (४ मार्च) साजरा केला गेला. अर्थात सुरक्षा ही केवळ औद्योगिक क्षेत्रापुरती मर्यादित नाही तर घरीदारी, बाहेर सर्वत्र तिची योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्राची सध्याची औद्योगिक वस्तुस्थिती पाहता मंदावलेले उद्योग, नवीन औद्योगिक गुंतवणूक, मेक इन इंडिया, स्टार्ट अप अशा घोषणा आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्व काही कागदोपत्रीच आहे असे अनुभवण्यास मिळत आहे.

योग्य त्या सेवासुविधा आणि निष्काळजीपणा यामुळे मागील तीन-चार वर्षांत उद्योग क्षेत्रात झालेले अपघात आपण पाहतोय. केवळ अपघातच नाही तर रासायनिक कंपन्यांच्या माध्यमातून वाढलेले प्रदूषण आणि नागरिकांचे आरोग्य हा प्रश्न तर ऐरणीवर आहे आणि याचे उदाहरण म्हणजे मागे झालेल्या एका सर्वेक्षणात देशातील राज्यांमध्ये डोंबिवलीसारखे सुशिक्षितांचे शहर प्रदूषणाबाबत अग्रस्थानी आहे. मध्यंतरी डोंबिवलीत पडलेला हिरवा पाऊस हासुद्धा फार मोठा चर्चेचा विषय झाला होता. तरीही शासन, एमआयडीसीसारख्या प्रशासकीय यंत्रणा गांभीर्याने लक्ष देत नाहीत. त्यानंतरसुद्धा याच परिसरात दुर्दैवाने दोन-तीनवेळा मोठे अपघात झाले. म्हणजेच शासन, प्रशासन, औद्योगिक विकास महामंडळ, मालक, व्यवस्थापन हे सर्वच या धोक्यासाठी जबाबदार आहेत. कारण त्याची ते गांभीर्याने दखल घेत नाहीत.

एकंदरीतच वाढती स्पर्धा, लाल फितीतील कामे, मनुष्यबळ यामुळे खरं पाहता उद्योगव्यवसाय चालविणे कर्मकठीण होत चाललेले आहे. अशा परिस्थितीत खासकरून औद्योगिक विकास महामंडळांतर्गत जे काही लघु अथवा मध्यम उद्योग, व्यवसाय येतात त्यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनून आर्थिक सेवासुविधा, त्याअनुषंगाने विविध उपक्रम राबविणे खरोखरच जिकिरीचे होत आहे. अशा वेळी शासन व औद्योगिक संस्था या दोघांनी मिळून योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक आहे. आज रासायनिक कंपन्यांमुळे हवेतील प्रदूषण वाढतेय. याकडे युद्धपातळीवर गांभीर्याने लक्ष देऊन किमान चार-पाच कारखान्यांमागे ‘एन्फ्युलंट ट्रीटमेंट प्लाण्ट’ अद्ययावत असणे जरुरीचे आहे. ज्यायोगे रसायनेयुक्त पाणी आणि वायू पाण्यात मिसळले तरी त्यावर योग्य ती प्रक्रिया होईल आणि ते पाणी नाल्याद्वारे सोडण्यास योग्य होईल. दुसरीकडे उघडे नाले बंदिस्त असणेसुद्धा महत्त्वाचे आहे. कारखान्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य त्या परवानग्या, प्रमाणपत्रे, ऑडिट यांचा पाठपुरावासुद्धा महत्त्वाचा आहे. सुरक्षेकरिता वापरली जाणारी साधनसामग्री आणि ती वापरण्यास कामगार-कर्मचारी यांना योग्य ती माहिती, प्रशिक्षण देणे मालक आणि व्यवस्थापनावर बंधनकारक करणे गरजेचे आहे. त्या सामग्रीची योग्य ती काळजीदेखील घेतली पाहिजे. कारण अपघात हे केव्हाही, कुठेही, अचानक होतात. ते सांगून होत नाहीत. म्हणून आपण औद्योगिक सुरक्षेबाबत सतर्क आणि जागरूक असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी शासन, प्रशासन, औद्योगिक महामंडळे, मालक आणि कामगार सर्वांनीच गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.

आपली प्रतिक्रिया द्या