पाश्चिमात्य देशांची नक्कल केल्याने ‘कोरोना’ ऐवजी अर्थव्यवस्थाच नष्ट झाली; उद्योगपती राजीव बजाज यांची टीका

10165

पाश्चिमात्य देशांची नक्कल करीत हिंदुस्थानात कठोर लॉकडाऊन करण्यात आले. याची मोठी किंमत अर्थव्यवस्थेला चुकवावी लागली आहे. कोरोना नष्ट झाला नाहीच त्याऐवजी अर्थव्यवस्थाच नष्ट झाली. हिंदुस्थानचे सकल घरेलु उत्पन्न (जीडीपी) फ्लॅट झाले आहे, अशा स्पष्ट शब्दात प्रसिद्ध उद्योगपती, बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली आहे.

कोरोना लॉकडाऊन आणि त्याचे आर्थिक, सामाजिक क्षेत्रावर होणारे परिणाम याविषयी काँग्रेस नेते राहुल गांधी विविध मान्यवरांशी संवाद साधत आहेत. यापूर्वी विख्यात अर्थतज्ञ डॉ. अभिजित बॅनर्जी, डॉ. रघुराम राजन यांच्याशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली होती. आज बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांच्याशी संवाद साधला. यावेळी बजाज यांनी आपली मते आक्रमकपणे मांडली आणि केंद्राच्या धोरणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे.

काय म्हणाले राजीव बजाज?
कोरोना नष्ट करण्यासाठी पाश्चात्य देशांचे अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, इटली यांचे अनुकरण करीत हिंदुस्थानात कठोर लॉकडाऊन केला. त्या देशांची भौगोलिक स्थिती, तापमान, रोगप्रतिकारशक्ती वेगळी आहे हे लक्षात ठेवले पाहिजे; पण आपला तोही प्रयत्न यशस्वी झालेला नाही. कोरोना नष्ट होण्याऐवजी आपला जीडीपी फ्लॅट झाला. अर्थव्यवस्था नष्ट झाली.

पाश्चात्य देशांऐवजी आपण पूर्वेकडील देशांकडे पाहायला हवे होते. जपानसारखी पावले उचलायला हवी होती. या देशांनी हार्ड इम्युनिटी (रोगप्रतिकारशक्ती) वाढविण्यावर भर दिला. याचा अर्थ ज्यांना संसर्ग झाला, जोखीम आहे अशांना वाऱ्यावर सोडून दिलेले नाही. सॅनिटायझेशन, मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले गेले. दुर्दैवाने हिंदुस्थानात अर्धवट लॉकडाऊन झाला. अशा लॉकडाऊनचे जगात दुसरे उदाहरण नाही.

जगात रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू हिंदुस्थानात होतात. हेल्मेट न वापरता दुचाकी चालवत असेल तर 99 टक्के प्रकरणात पोलीस काहीही बोलत नाहीत. पण एखाद्याने मास्क घातला नसेल तर पोलीस काठीने मारहाण करतात, अपमान करून उठाबशा काढायला लावतात. यातून ज्येष्ठ नागरिकही सुटले नाहीत हे मी स्वतःहा पाहिले आहे.

मुड इलिव्हेटरची गरज; लोकांच्या हातात पैसे द्या
कठोर लॉकडाऊनने प्रश्न सोडविलेला नाही. कोरोना व्हायरस आहेच आणि अनलॉकनंतर संसर्ग होऊ शकतो अशी भितीही लोकांमध्ये आहे. त्यामुळे लोकांच्या मुड इलिव्हेटरची (लिफ्ट) गरज आहे.  मुड सहा महिने एक वर्षापर्यंत लिफ्ट करण्यासाठी लोकांच्या हातात सरकारने थेट पैसे दिले पाहिजेत.  अमेरिका, जपानने प्रत्येक नागरिकाला एक हजार डॉलर दिले आहेत. दोन तृतीयांश रक्कम या देशांनी दिली आहे. हिंदुस्थानात सरकारने जीडीपीच्या केवळ 10 टक्के तरतूद केली आहे, याकडे बजाज यांनी लक्ष वेधले.

बोलू नका असा सल्ला मलाही दिला होता
राहुल गांधींशी चर्चा करू नका, सरकारविषयी स्पष्टपणे बोलू नका, अडचणीत याल असा सल्ला काहींनी मला दिला होता; पण मी केवळ लॉकडाऊन, अर्थव्यवस्था आणि उद्योग यावरच बोलणार आहे, असे त्यांना सांगितल्याची माहिती बजाज यांनी दिली. जर शंभरजण बोलण्यासाठी घाबरत असतील तर कदाचित 90 जणांकडे काहीतरी लपविण्यासारखे असेल असा माझा अंदाज असल्याचे राजीव बजाज म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या