अंतर्नाद… क्षण आला भाग्याचा

354

<< वृषाली प्रधान >>

पौष महिना! पहाटेचा सुखद गारठा! ऊबदार दुलईत मस्त लोळत राहावे असा विचार मनात येतो न येतो तोच क्षणात पुढील दिनक्रम डोळय़ासमोर आल्याने आपण क्षणाचीही उसंत न घेता पुढील तयारीला लागतो. दिवसभरातील कामकाजाचे क्षणात अनेक बेत आखले जातात. प्रत्येकाच्या आयुष्यातील या क्षणांचे  रूप मात्र जरा वेगवेगळे!

वर्तमान काळातील क्षणांपेक्षा, भूतकाळातील रम्य क्षण आठवत, भविष्य काळातील अनेक संकल्पांच्या सुखद क्षणांमध्ये आपण सारेच अधिक रमतो. आयुष्याच्या वाटचालीमध्ये हेच क्षण कधी सुखाची झालर पांघरीत वाऱयाच्या वेगाने  येतात तर कधी क्षणात दु:खाचा डोंगर उभा करतात. डोळय़ासमोर घडलेल्या एखाद्या विचित्र अपघाताने पहाडासारखा खंबीर माणूस क्षणात हतबल होतो, तर सुनामीसारखी एखादी नैसर्गिक आपत्ती क्षणात आपल्या देशाचा नकाशाच बदलवून टाकते, तर कधी –

क्षणात येते सरसर शिरवे

क्षणात फिरूनी ऊन पडे…

असे म्हणत क्षणात बदलणारा निसर्ग! बालकवींच्या कविमनाला भुरळ पडली नाही तर नवलच! अवघ्या काही सेकंदांचा हा क्षण! पण  त्याला किती विविध कंगोरे! डोंबाऱयाच्या खेळातील उत्कंठा वाढवणारा अन् अंगावर काटा आणणारा तो चित्तथरारक क्षण! अटीतटीचा क्रिकेट सामना, अत्यंत चुरशीची फुटबॉलची मॅच अथवा रंगात आलेला कबड्डीचा सामना क्षणाक्षणाला आपली उत्कंठा अशी काही वाढवतो की क्षणभर आपला श्वासदेखील रोखला जातो, तर कधी हास्याचा शिडकावा करणारा एखादा क्षण संपूर्ण वातावरणच बदलवून टाकतो.

बरेचसे क्षण बहुतांशी यशस्वी, निर्णायक! तर कधी चुकीच्या निर्णयापासून वेळीच सावध करणारा मौल्यवान क्षण! माणसातील माणुसकी जागवणारे, कायम स्मरणात राहणारे निरंतर क्षण! पहिल्या पगाराचा अत्युच्च आनंद देणारा क्षण, कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडीत असतानाच व्यावहारिक जगात होणाऱ्या मान-सन्मानाचे क्षण! त्याहूनही सरस वाटणारा आप्तस्वकीयांकडून पाठीवर पडलेल्या कौतुकाच्या थापेचा परमानंदाचा क्षण! क्षण अन् क्षण स्वत:चे वेगळे अस्तित्व दाखविणारा! सकारात्मक दृष्टीने आनंद शोधला तर काही अपवाद वगळता सारे क्षण निखळ आनंद देणारेच!

धकाधकीच्या पुढील वाटचालीत बालपणीचे मित्रमैत्रिणी अचानकपणे भेटल्याच्या निर्भेळ आनंदाचा क्षण, उत्तुंग यशाची धुंदी देणारा बेधुंद क्षण, घटकाभर करमणुकीबरोबर काही फुरसतीचे क्षणही तितकेच महत्त्वाचे! तर दैनंदिन व्यवहारात अचानकपणे बदल घडवून आणणारे धाडसी, राजकीय, सामाजिक निर्णायक क्षण म्हणजे तर क्षणाक्षणाला बदल घडवणारे क्षण! अशोकवनातील सीतेलाही क्षणभर का होईना, कांचनमृगाचा मोह झाला…. अन् त्यातूनच पुढे रामायण घडले.

दुग्धशर्करा योग, मणिकांचन योग असे योगायोगाचे काही दुर्लभ क्षण! अन् त्या क्षणांनी गुंफलेला जणू कालचक्राचा सुंदर गोफ! या विश्वातील ठाहमालादेखील अखंडपणे क्षणाचीही उसंत न घेता सूर्याभोवती फिरत असते. म्हणूनच क्षणाक्षणाला सूर्याभोवती गुंजी घालणाऱ्या पृथ्वीला कविवर्य कुसुमाग्रजांनी प्रियकर आणि प्रेयसीची यथार्थ उपमा दिली आहे.

पुराणकालातील कथांमध्ये आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांना भरभरून आशीर्वाद देणारे साक्षात भगवंतदेखील क्षणात अंतर्धान पावत असत. पण अनादिकालापासून सुरू असलेल्या आजीच्या घडाळय़ाला मात्र क्षणाचीही उसंत नाही. अव्याहतपणे चालू असलेली ही टिकटिक क्षणाक्षणाने काळालाही मागे टाकीत जाते. आपले आयुष्य क्षणभंगूर ठरविणारा हा क्षण निश्चितच अमर आहे.

केवळ एक निसटता क्षण! या क्षणाने तर व्यावहारिक दिनदर्शिकाच बदलवली. काळाची पावले वर्ष दोन हजार सतरा या नवीन वर्षांत अलगद पडली आहेत. प्रत्येक पाऊल देशाच्या प्रगतीशील वाटचालीचे ठरो ही सदिच्छा! नवीन वर्षातील घोडदौडीसाठी…

 

 

आपली प्रतिक्रिया द्या