बाळाचे शव फ्रीजरमध्ये ठेवून कर्मचारी विसरून गेले? मध्य प्रदेशातील सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

इंदोर येथील महाराजा यशवंतराव होळकर हे मध्यप्रदेशातील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय आहे. बेजबाबदारपणासाठी हे रुग्णालय कुख्यात आहे. काही दिवसांपूर्वी शवागारात ठेवलेल्या मृतदेहाचा अंत्यसंस्काराची वाट पाहत अक्षरशः सांगाडाच उरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. ही घटना ताजी असतानाच याच रुग्णालयातील शवागरातील शीतपेटीमध्ये एका बॉक्समध्ये अज्ञात बाळाचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली आहे. गेले 5 दिवस या बाळाचे शव या शवागरात पडून होते. या बाळाचा 12 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला होता असे कळाले आहे.

17 सप्टेंबर रोजी शवागरात या बाळाचा मृतदेह सापडला होता. या बाळाचे शव शीतपेटीमध्ये ठेवून कर्मचारी ते विसरून गेले असावेत अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. रुग्णालयातील सूत्रांच्या हवाल्याने काही संकेतस्थळांवर याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या बातम्यांमध्ये म्हटले आहे की हे बाळ रस्त्याच्या कडेला सापडले होते. 11 सप्टेंबर रोजी या बाळाला अलीराजपूर भागातील रस्त्यावर सोडून दिले होते. एका समाजसेवकाने या बाळाला उचलून रुग्णालयात आणले होते. ज्या दिवशी त्याला रुग्णालयात आणले होते त्याच दिवशी म्हणजे 12 सप्टेंबर रोजी बाळाचा मृत्यू झाला होता.

बेजबाबदारपणासाठी कुप्रसिद्ध असलेल्या इंदोर येथील महाराजा यशवंतराव होळकर या रुग्णालयातील शवागारात 16 फ्रीझर आहेत. या फ्रीजरमध्ये मृतदेह ठेवण्याची सोय आहे. तीव दिवसांपूर्वी मृतदेह शवागारातील स्ट्रेचरवरच ठेवण्यात आलेल्या मृतदेहाची बातमी प्रसिद्ध झाली होती. हा मृतदेह नेण्यासाठी कुणीही आले नाही. अंत्यसंस्काराची वाट पाहत हा मृतदेह सडला होता आणि त्यावरील त्वचा गळून पडली होती. मृतदेहाची प्रचंड दुर्गंधी सुटली होती. दुर्गंधी सुटल्याची बोंबाबोंब झाल्यानंतर हा मृतदेह स्ट्रेचरवरून हलवण्यात आला होता.

एकच आठवडा मृतदेह ठेवतात
रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. पी. एस. ठाकूर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की बेवारस मृतदेह आम्ही एक आठवडा ठेवतो. या काळात कुणी नातलग आला तर त्यांच्या हवाली करण्यात येतो. नसता अंत्यसंस्कारासाठी एनजीओ का महानगरपालिकेला सूचना देण्यात येते. कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या जास्त आहे. त्यामुळे मृतदेह ठेवण्यासाठी जागा कमी पडत आहे. त्यामुळे कदाचित असा प्रकार घडला असावा अशी सारवासारव त्यांनी केली.

ना पोस्टमॉर्टेम झाले ना तपासणी
शहरात सापडलेले अज्ञात मृतदेह शवविच्छेदनासाठी महाराजा यशवंतराव रुग्णालयात पाठवण्यात येतात. दहा दिवसांपूर्वी हा मृतदेहही आणण्यात आला. स्ट्रेचरवर आणलेला मृतदेह तसाच ठेवण्यात आला. त्याचे ना पोस्टमॉर्टेम झाले ना तपासणी. त्या मृतदेहाकडे कुणी ढुंकूनही पाहिले नाही. मृतदेह बेवारस असेल तर पोस्टमॉर्टेमनंतर महानगरपालिका का एनजीओकडे अंत्य संस्कारासाठी देण्यात येतो.

आपली प्रतिक्रिया द्या