गणेशोत्सवाला महागाईचे तोरण, बाजारात मंदीउत्सव

359

गणेशोत्सव अवघ्या सात दिवसांवर येऊन  ठेपलायगणेशाची आरास, फुले, मखर यांनी बाजारपेठा सजल्या. अगरबत्ती, धूप यांचा सुगंधही दरवळू लागलाय. पण या वातावरणाचा माग घेत बाजारात उत्साह फुलवणारा ग्राहक राजाच थंडावलाय. एकीकडे फुलांपासून मखरांपर्यंत हजारोच्या भावात कडाडलेला दर आणि खिशाला लागलेली मंदीची कातर यामुळे या गणेशोत्सवावर मंदीचे सावट असल्याचे स्पष्ट संकेतच मिळू लागले आहेत.

गणरायाच्या आगमनासाठी मुंबापुरी सज्ज झाली आहे. घराघरांत येणार्‍या बाप्पाच्या स्वागतासाठी लगबग सुरू झाली आहे. तर दुसरीकडे चाकरमान्यांनी गणेशोत्सवासाठी गावाकडे जाण्यासाठी बांधाबांध सुरू केली आहे. याचा एकंदर परिणाम बाजारपेठेवर एव्हाना दिसायला हवा होता. मात्र गणेशोत्सवाच्या तयारीसाठी महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या दादर, लालबागसारख्या बाजारपेठांत ग्राहकांचा थंडा प्रतिसाद आहे. याला कारणही तसेच आहे ते म्हणजे कडाडलेले दर. कोल्हापूर, सांगली, नाशिक, कोकण येथील पूरस्थितीमुळे बाजारातील आवक कमी झाली आहे. यामुळे फुले, भाज्या यांचे दर कडाडले आहेतच, शिवाय मकर, कंठी, सजावटीचे पडदे या सर्वांचेच दर 30 ते 40 टक्क्यांनी वाढले आहेत.

बाजार फुलांचा महागाईने भरला

सध्याचा दर किलोमागे

मोगरा       1200 रु.

अबोली      2000 रु.

शेवंती        200 रु.

गोंडा         100 रु.

तेरडा         150 रु.

भाज्यांनाही महागाईची फोडणी

भाजी  जुना दर नवा दर

वाटाणा    80        100

गवार      100       120

राजमा     80        100

वांगी        80        100

कोबी       70         80

मखरही सजले नाही

दादरच्या छबिलदास गल्लीत गणेशोत्सवासाठी मिळणार्‍या मखरांचे दरही 2500 रुपयांपासून ते थेट 25 हजार रुपयांपर्यंत चढले आहेत. अक्षय डेकोरेटरचे अरुण दरेकर म्हणालेमंदीचा फटका आम्हा कलाकारांनाही बसला आहे. मखरला बाजारात उठाव नाही.

 35 वर्षांतली सर्वाधिक महागाई

मुंबईत प्रामुख्याने नाशिक, बंगलोर, पुणे, जुन्नर, कोल्हापूर, सांगली भागातून फुलांची आवक होत असते. कोल्हापूर, सांगलीतून होणारी आवक जवळजवळ ठप्पच झाल्यात जमा आहे. गणेशोत्सव होईपर्यंतही ही परिस्थिती सुधारेल असे चिन्ह नाही. 35 वर्षांत यंदा पहिल्यांदाच एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर फुले महागणार असल्याचे फूल विक्रेते नामदेव वरे यांनी सांगितले.

 सजावटीची फुले महागली

जर्बेरा, शेवंती, गुलाब ही फुले गणेशाभोवतीच्या सजावटीसाठी वापरली जातात. मात्र आवक घटल्याने याचे दरही वाढले आहेत. 20 रुपयांना मिळणारे जर्बेराचे बंडल 50 ते 70 रुपयांपर्यंतर तर गुलाबही अगदी 60 ते 80 रुपये दराने मिळत आहेत. पुरामुळे आवक घटल्याने दर वाढले असल्याचे एका विक्रेत्याने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या