भादा परिसरात सोयाबीन पिकावर उंट अळीचा प्रादुर्भाव

89

सामना प्रतिनिधी । उटी

भादा परिसरात सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे त्यामुळे पिकं धोक्यात आली आहेत. या परिसरात १५ टक्के पेरणी झालेली असून ते सोयाबीन पीक वीस ते बावीस दिवसाची आहे. या पिकावर मोठ्या प्रमाणावर अळींचा प्रादुर्भाव असल्याने पिके धोक्यात आले आहेत. अगोदरचा अल्प पर्जन्यमान असल्यामुळे कशीबशी पिके आली त्यानंतर पिकावर अळी दिसू लागल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

या परिसरातील बऱ्हाणपूर, समदर्गा, कोरंगळा, आंदोरा, वडजी, भेटा इत्यादी गावातील शेतकऱ्यांनी पंधरा टक्के पेरणी केली होती. गेल्या आठवड्यात या परिसरात बऱ्यापैकी पाऊस झाला त्यावर सोयाबीन हिरवे झाले. त्यानंतर ढगाळ वातावरण असल्यामुळे पाने कुरतडणारी अळी, पान गुंडाळणारी आळी याचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाचे नुकसान होण्याची शक्यता शेतकरीवर्गातून वर्तवली जात आहे.

उटी बु. चे कृषी सहाय्यक ए.जी. गोरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी क्लोरोपायरीफॉस २ मिली प्रति लिटर लिंबोळी अर्क २ मिली प्रति लिटर वापरावे, असे सांगितले. या भागात उर्वरित पेरण्याला प्रारंभ झाला आहे मात्र प्रशासकीयदृष्ट्या १५ जुलै ही वेळ आहे तरीही शेतकरी पेरणी करत आहेत. त्यामुळे ही पिके जोमात येतील का नाही याची शंका शेतकऱ्यांना सतावत आहे. एकंदरीत या परिसरावर दुष्काळाचे सावट निर्माण झालेले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या