जुळी बाळं हवीत…

सामना ऑनलाईन

जुळ्या बाळांची गंमत सगळ्यांनाच वाटते. एकमेकांसारखं दिसणं… हे या बाळांचं इतरांना आकर्षित करण्याचं पहिलं मर्म… कौतुकाचा विषय असलेली ही एकमेकांसारखीच दिसणारी बाळं काही वेळा एकमेकांपेक्षा अगदी वेगळीही दिसतात. ज्यांना बाळांची आवड आहे, अशा काही जोडप्यांनाही आपल्याला जुळं व्हावं अशी इच्छा असते, मात्र इच्छा असली तरी या बाळांविषयी समाजात काही समज-गैरसमजही आहेत. म्हणून ज्या आई-बाबांना जुळ्या बाळांची आवड आहे, त्यांनी आपल्या मनातील शंका दूर करण्याकरिता जुळ्या बाळांच्या जन्माविषयी माहिती मिळवणे गरजेचे ठरते.

जुळ्या मुलांमध्ये एकमेकांसारखी दिसणारी (मोनोझायगोटिक) आणि एकमेकांसारखी न दिसणारी (डिझायगोटिक) असे दोन प्रकार आहेत. जी जुळी बाळे (मोनोझायगोटिक ट्विन्स) एकसारखी दिसतात अशा प्रकारच्या बाळांमध्ये सारखेच जेनेटिक कम्पोझिशन्स असतात. कारण एका स्पर्मपासून ही जुळी बाळे तयार होतात. जी जुळी बाळे डिझायगोटिक ट्विन्स होतात, त्यांमध्ये दोन स्पर्म्सचा संबंध येऊन बाळाची निर्मिती होते. यामुळे या जुळ्या बाळांचे जेनेटिक कम्पोझिशनदेखील वेगवेगळे असते.

वाढते वय, उंचीचा परिणाम
जसे आईचे वय वाढते तसे शरीरात फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनचे प्रमाण वाढते. या हार्मोनमुळे अंडाशयातून अंड्याची निर्मिती होण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे जुळं होण्याची शक्यता वाढते. अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी कॉन्ट्रासेप्टिव्हचा वापर केला जातो, मात्र कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेण्याची सवय असणाऱ्यांमध्ये गोळ्या घेणं बंद केल्यावर शरीरात हार्मोनल बदल होतात. यामुळे बाळासाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये जुळ्या बाळाची निर्मिती होण्याची शक्यता वाढते.

अनुवंशिकतेमुळेच…
घरात जर पूर्वी जुळ्या बाळांचा जन्म झाला असेल तर तुम्हालाही अनुवंशिकतेने जुळी बाळं होऊ शकतात. तसेच आई जर स्वतः जुळ्यांपैकी असेल तर जुळं होण्याची शक्यता वाढते. यामध्ये वडिलांच्या कुटुंबीयांशी कोणताही संबंध नसतो. अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिक्स ऍण्ड गायनॅकोलॉजी यांनी केलेल्या अभ्यासानुसार, उंच स्त्रियांमध्ये जुळं होण्याची शक्यता जास्त असते.

आयवीएफमुळे शक्य
पूर्वी जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा गरोदर स्त्रियांमध्ये जुळ्यांचा जन्म होण्याची शक्यता वाढते. आयवीएफ (इन-विट्रो फर्टिलायझेशन) च्या मदताने शरीराबाहेर गर्भधारणा करून आयवीएफद्वारे जुळं बाळ प्लॅन करता येतं.