गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा….

>> प्रतीक राजूरकर

”ये प्रकृत्यादत्यो जड़ा जीवाश्च गण्यन्ते संख्यान्ते तेषामीश:” गण म्हणजे संख्या त्यांचा पती अथवा ईश यातून गणपती आणि गणेशाचा अर्थ सूचित होतो. प्राकृतातील समस्त जीवांचे पालकत्व स्वीकारणारे गणपती म्हणूनच सर्व देवतां मध्ये अग्रस्थानी आहेत, त्यांच्याकडेच सकल जगाचे स्वामित्व आहे.

गणपते: सकलजगत्स्वामिनोयं सेवकोगाणपत:
गणपतीला ब्रम्हणस्पत म्हणून वेदात संबोधले आहे, इथे ब्रम्हणस्पती म्हणजे मंत्रांचा स्वामी,

ज्येष्ठराजं ब्रम्हणां ब्रम्हणस्पत अग्ने शृण्वन्नू तिभि: सीद सादनम।।
देवतांमध्ये ज्येष्ठ आणि सर्वश्रेष्ठ असे मंत्र आणि स्तोत्रांचे स्वामी आमच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून यज्ञ स्थानी आपली उपस्थिती असावी. देवगणांचा स्वामी म्हणून गणपतीला मान्यता दिलेली आहे, ब्रम्हज्ञानात सर्वश्रेष्ठ असल्याने गणपती हे देवगणात सुध्दा सर्वोच्च आणि श्रेष्ठ ठरतात.

देवादिगणनां संबंन्धिन्नं गणपती
ऋग्वेद, यजुर्वेदात गणेश गणपती म्हणून उल्लेख आढळतो नंतर गृहसूत्र, पुराण आदी अनेक ग्रंथात गणेशाची अनेक रूपं आणि अवतार आले आहेत. बोधायन गृहसूत्रात (३/३/१०) विनायक नावाचा उल्लेख आहे, जो विद्वानांच्या मते अथर्ववेदीय आहे. विनायकाची सहचारिणी म्हणून ज्येष्ठाचा हस्तिमुखा म्हणून वर्णन आहे. बोधायन गृहसूत्रातील भूपती, भूतपती, भूतानापती हे संबोधन विनायकाची रूद्र स्वरूप असल्याची पुष्टी करणारे आहे. काही विद्वानांचा तर्क आहे की, विनायकाचे स्वरूप विकसित होऊन पुढे गणपतीला रुद्राचे पुत्र म्हणून मान्यता प्राप्त होऊ लागली आणि रूद्र आणि गणेश हे दोन वेगळे देव म्हणून अस्तितवात आले. पुराण काळात रुद्राचे पुत्र म्हणून विनायक आणि स्कंद नावरुपास आले. कालांतराने विनायक हे वक्रतुंड, एकदंत, लम्बोदर, विघ्नहर्ता इत्यादी अनेक नावांनी कथारुपाने धर्मग्रंथात त्यांच्या नावातील वैशिष्ट्याप्रमाणे रचनाकारांनी जगासमोर उलगडले. गणेश तत्वाची शक्ती, महिमा त्यांच्या अवतारातील विघ्ननाश करण्याच्या सामर्थ्यामुळे विघ्नहर्ता स्वरूप हे शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून कुठल्याही शुभकार्यात गणेशाचे स्थान आद्य आहे. संत ज्ञानेश्वरांनी “ॐ नमोजी आद्या। वेदप्रतिपाद्या।” म्हणून श्री गणेश वंदनेत वर्णन केले आहे.

शिव पार्वती पुत्र गणेश देवतेला अनादि, अनंत, अखंड, ज्ञानसमृद्ध, पूर्ण परमात्मा हे पाच देवतत्व असल्याने देवश्रेष्ठ म्हणून पुराण रचनाकारांनी वर्णन केले आहे. शिव पार्वती साक्षात गणपतीचे माता-पिता असल्याने संबंधित पुराणात गणेशाचा उल्लेख आहेच, या व्यतिरिक्त ब्रम्हवैवर्त, स्कंद, नारद, पद्म, महाभारत इत्यादी पुराण आणि धर्मग्रंथात आढळतो. गणपतीला देवतत्वात पूर्णत्व असल्याने त्यांचे विविध अवतारांचे वर्णन पुराणात शिव, विष्णु, दुर्गा यांच्या प्रमाणे आहेत, शिव, लिंग पुराण, देवी पुराण, विष्णु पुराण या प्रमाणे गणेश पुराण आणि मुद्गल पुराण हे श्रीगणेशाच्या विविध अवतार कार्याचे वर्णन करणारे आहे. हे दोन्ही पुराण पूर्णतः गणपतीची महिमा, श्लोक, मंत्र, पूजा विधी इत्यादींचे वर्णन करणारी असून गणेश उपासकांनी गणेश महात्म्याला समर्पित केलेली आहेत.

सगुण साकार स्वरूपातील श्री गणेशाचे  देशातील विविध भागात वेगवेगळ्या स्वरुपाच्या अनेक गणेश मूर्ती असलेली मंदिरं आहे. गणपतींचे अनेक स्वरूप देशभरात बघावयास मिळतात. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात अठरा भुजा असलेले गणपती मंदिर प्रसिद्ध आहे. भक्तांनी त्यांना झालेल्या साक्षात्कार आणि भक्तीतून सगुण साकार उपासने साठी विविध प्रकार आणि आकारांच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केलेली आहे. पुराणात मान्यता असल्याने शास्त्रीय आहे. म्हणून गणेश भक्तांत या ३२ प्रकारच्या स्वरूपाची उपासना मोठ्या प्रमाणात केली जाते.

१) श्री बाल गणपति – सहा भुजा आणि लालसर वर्ण

२) श्री तरुण गणपति – अष्ट भुजा असलेले रक्तवर्ण

३) श्री भक्त गणपति – चार भुजा आणि श्वेतवर्ण

४) श्री वीर गणपति – दहा भुजा असलेले रक्तवर्ण

५) श्री शक्ति गणपति – चार भुजा शेंदरी वर्ण

६) श्री द्विज गणपति – चार भुजा शुभ्रवर्ण

७) श्री सिद्धि गणपति – सहा भुजा पिंगल वर्ण

८) श्री विघ्न गणपति – दशभुजाधारी सोनेरीवर्ण

९) श्री उच्चिष्ठ गणपति – चार भुजाधारी नीलवर्ण

१०) श्री हेरम्ब गणपति – अष्ट भुजाधारी गौरवर्ण

११) श्री उद्ध गणपति – सहा भुजाधारी सोनेरीवर्ण

१२) श्री क्षिप्र गणपति – सहा भुजाधारी रक्तवर्ण

१३)  श्री लक्ष्मी गणपति – अष्ट भुजाधारी गौरवर्ण

१४) श्री विजय गणपति – चार भुजाधारी रक्तवर्ण

१५) श्री महागणपति – अष्ट भुजाधारी रक्तवर्ण

१६) श्री नृत्त गणपति – सहा भुजाधारी रक्तवर्ण

१७) श्री एकाक्षर गणपति – चार भुजाधारी रक्तवर्ण

१८) श्री हरिद्रा गणपति – सहा भुजाधारी पिवळे वर्ण

१९) श्री त्र्यैक्ष गणपति – सुवर्णवर्ण त्रिनेत्र असलेले चार भुजाधारी

२०) श्री वर गणपति – सहा भुजाधारी रक्तवर्ण

२१) श्री ढुण्डि गणपति – चार भुजाधारी रक्तवर्णी

२२) श्री क्षिप्र प्रसाद गणपति – सहा भुजाधारी त्रिनेत्र आणि रक्तवर्ण

२३) श्री ऋण मोचन गणपति – चार भुजाधारी लालपितांबर

२४) श्री एकदन्त गणपति – सहा भुजाधारी श्यामवर्ण

२५) श्री सृष्टि गणपति – चार भुजाधारी, रक्तवर्ण, मूषकावर स्वार

२६) श्री द्विमुख गणपति – पिवळावर्ण  चार भुजा आणि द्विज मुख असलेले

२७) श्री उद्दण्ड गणपति-बारह भुजा रक्तवर्ण, हातात कुमुदनी आणि अमृत पात्र धरलेले.

२८) श्री दुर्गा गणपति – आठ भुजा रक्तवर्ण लाल पितांबर

२९) श्री त्रिमुख गणपति – तीन मुख, सहा भुजा, रक्तवर्ण

३०) श्री योग गणपति – योगमुद्रा, चार भुजा आणि नील वस्त्रात

३१) श्री सिंह गणपति – श्वेत वर्ण आठ भुजा, सिंहाचे मुख आणि हत्तीची सोंड असलेले.

३२) श्री संकष्ट हरण गणपति – चार भुजा रक्तवर्ण हिरे जडि़त मुकूट घातलेले.

गणेश पुराण, मुद्गल पुराण, ब्रम्ह पुराण आणि ब्रम्हांड पुराण ह्यात गणेश देवतेबाबत विस्तारपूर्वक वर्णन आहे. गणेश आणि मुद्गल ही दोन उपपुराणे आहेत तर ब्रम्ह पुराण आणि ब्रम्हांड पुराण ही महापुराण आहेत. ब्रम्हांड पुराणात श्री गणेशाचे वर्णन हे सगुण रुपात आहे तर ब्रम्ह पुराणातील श्री गणेशाचे वर्णन निर्गुण स्वरूपातील आहे. गणेश पुराणात सगुण आणि निर्गुण गणेश तत्वाचे वर्णन आहे तर मुद्गल पुराणात अस्तित्वात असलेल्या आणि नसलेल्या प्रत्यक्ष अथवा वास्तविकतेचे आणि आत्मिकतेचे एकत्रीकरण असल्याचे अभ्यासक विद्वानांचे मत आहे.

मुद्गल पुराण:

अभ्यासकांच्या मते मुद्गल पुराणावर विद्वानांची टीका आढळत नाही, ज्यामध्ये विविध साहित्याच्या माध्यमातून पुष्टी मिळू शकेल असे साहित्य उपलब्ध नाही म्हणून मुद्गल पुराणातील साहित्यात विविधता आहे, त्यामुळे वेगवेगळ्या भाषेतील मुद्गल पुराणात काही प्रमाणात एकवाक्यतेचा अभाव आहे.

मुद्गल पुराणात श्री गणेश अवतारांचे वर्णन आहे, जे कालानुरूप आपले अवतार कार्य करण्यास अवतरले, श्री गणेशाचे अवतार अनादि अनंत आहेत, पण  त्यातील आठ अवतार हे गणेश भक्तांत अतिशय महत्वाचे आहेत. कारण, ते अमानवीय दुष्कर्म असलेल्या मद, मोह, मत्सर, लोभ, अहंकार, वासना, क्रोध, उर्मटपणावर विजय प्राप्त करुन सदाचाराचे प्रतिनिधित्व करणारे आहेत त्या आठ अवतारांचे वैशिष्ट्य आणि अवतार कार्य असे आहे:

१) वक्रतुंड अवतार हा मुद्गल पुराणतील पहिला अवतार आहे जो ब्रम्हस्वरूपी असून मत्सरासुर नावाच्या राक्षसाचा आणि त्याच्या दोन पुत्रांचा संहार करणारा आहे, मत्सरासुराने शिवाची तपश्चर्या करुन काही महाशक्तीचे वरदान प्राप्त केले होते, त्या शक्तींनी त्याने क्रौर्याची परिसीमा गाठली होती, देवी देवतांच्या विनंती वरुन वक्रतुंड अवताराने सिंहावर आरूढ होऊन मत्सरासुराचा आणि पुत्रांचा संहार केला.

२) एकदंत हा अवतार मदासुर नावाच्या दानवाचा संहार करणारा आहे, मदासुराने शुक्राचार्यांकडून वरदान प्राप्त होते, सर्व देवतांचा पराभव करून मदासुराला अहंकार झाला होता म्हणून श्री गणेशांनी एकदंत अवतार धारण करुन संहार केला. या अवताराचा हेतु हा गर्वहरण आणि अहंकाराचा नाश करणे आहे.

३) महोदर हा वक्रतुंड आणि एकदंत अवताराचे एकत्रीकरण करणारा अवतार आहे, मूषक वाहनावर आरूढ हा अवतार गैरसमज आणि भ्रम दूर करण्याचा हेतूने अवतरला कुठलेही युध्द न होता मोहासुर श्री गणेशाच्या महोदर अवतारास शरण गेला.

४) गजवक्त्र हा महोदर अवताराची परिपूर्ती करणारा अवतार आहे, भगवान शिवाच्या वरदानाने निर्भयतेचे वरदान प्राप्त असलेला लोभासुराचा संहार करण्याच्या उद्देशाने गजवक्त्र अवताराचा जन्म झाला.

५) लंबोदर अवतार हे शक्तीचे प्रतीक असून मूषकावर आरूढ आहे, क्रोधासुर नावाच्या असुराचा संहार करणारा म्हणून हा श्री गणेशाचा अवतार आहे. सूर्याची उपासना करून अनेक शक्ती क्रोधासुराने आत्मसात केल्याने त्रिलोकात त्याची सत्ता निर्माण झाली, देवतांनी केलेल्या प्रार्थनेतून लंबोदर अवताराने या असुराचा संहार करुन त्रिलोकात शांतता प्रस्थापित केली.

६) विकट हा कामासूर नावाच्या असुराचा संहार करणारा अवतार आहे, कामासुर असुराच्या अधर्म आचरणाणे देव आणि पृथ्वीलोकात उच्छाद मांडला होता, श्री गणेशाने देवतांच्या आराधनेला हाक देऊन विकट अवतार धारण करून कामासुराचा संहार केला, विकट अवताराचे वाहन हे मयूर आहे.

७) विघ्नराजा हा विष्णूचे प्रतीक असून ममासूर नावाच्या असुराचा संहार करणारा अवतार आहे जो शेषावर आरूढ आहे. शेषावर आरूढ असल्याने हा अवतार विष्णूचे प्रतिनिधित्व करणारा असल्याचे विद्वानांचा तर्क आहे.

८) धूम्रवर्ण अवतार मूषकावर आरूढ आहे, अभिमानासुराने श्री गणेशाची तपश्चर्या करून अनेक महाशक्ती प्राप्त केल्या, त्याच्या अभिमानात अभिमानासुराने भयंकर अत्याचार सुरु केले त्याचा संहार करण्यासाठी श्री गणेशाने धूम्रवर्ण असे रौद्र रुप धारण केले त्यांच्या अंगातून ज्वाला उत्पन्न होत होत्या धूम्रवर्ण अवताराचा रंग धूरा समान असल्याने धूम्रवर्ण हे नाव धारण करून अभिमानासुराचा संहार केला. हा अवतार शिवाचे प्रतिनिधित्व करणारा असल्याचे विद्वानांचा तर्क आहे.

श्री गणेशाचे वर्णित आठ अवतार हे असुरांच्या नावावरून आणि कथेवरुन षडरिपूंचा संहार करणाऱ्या गणांच्या देवतेचे महत्व दर्शविणारे आहे, मानवातील या षडरिपूंवर विजय प्राप्त करण्यासाठी भगवान श्री गणेशाला शरण गेल्याने या दुर्गुणांचा नाश करता येणे सहज शक्य आहे म्हणून भगवान श्री गणेश हे गणांचे पती अथवा ईश आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या